IPL 2025 : IPLच्या इतिहासात 9 वर्षानंतर होणार अशी फायनल, नेमकं काय घडणार?; कट्टर क्रिकेटप्रेमी असाल तर हे माहीतच हवं

आयपीएल 2025 चा अंतिम सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. 9 वर्षांनंतर आयपीएलमध्ये चाहत्यांना एक खास दृश्य पाहायला मिळणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ त्यांचे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी खेळणार आहेत.

IPL 2025 : IPLच्या इतिहासात 9 वर्षानंतर होणार अशी फायनल, नेमकं काय घडणार?; कट्टर क्रिकेटप्रेमी असाल तर हे माहीतच हवं
आयपीएल फायनल
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 02, 2025 | 10:49 AM

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 चा उद्या रंगणारा अंतिम सामना हा एक ऐतिहासिक सामना असेल. 3 जून 2025 रोजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांशी भिडणार असून विजेतेपदासाठी ही लढत असेल. या दोन्ही संघांसाठी हा हंगाम आतापर्यंत खूप चांगला गेला आहे. लीग टप्प्यात हे संघ टॉप-2 मध्ये होते आणि आता जेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहेत. हा सामना चाहत्यांसाठीही खूप खास असणार आहे. कारण आयपीएलमध्ये तब्बल 9 वर्षांनंतर एक खास दृश्य पाहायला मिळणार आहे.

9 वर्षांनी आयपीएलमध्ये रंगणार अशी फायनल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आता त्यांच्या पहिल्या आयपीएल जेतेपदासाठी उत्सुक असून त्याकडेच सगळं लक्ष केंद्रित केलं आहे. तर 2016 नंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा असे दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर येत आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकलेले नाही. याचा अर्थ असा की आयपीएलला यंदा, नवा, आठवा नवीन विजेता मिळेल आणि 2022 नंतर पहिल्यांदाच एखादा नवीन संघ विजेतेपद जिंकेल.

यापूर्वी 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला होता. तेव्हा दोन्ही संघांना एकही विजेतेपद मिळालेले नव्हते. तेव्हा सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला हरवून पहिले विजेतेपद जिंकले. मात्र त्यानंतर 2017 ते 2024 पर्यंत, प्रत्येक अंतिम फेरीत किमान एक संघ असा होता ज्याने आधी विजेतेपद जिंकले होते. उदा, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स किंवा कोलकाता नाईट रायडर्स.

2022 नंतर नवा चँपियन

2022 मध्ये, गुजरात टायटन्सने त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले, त्यांच्या पदार्पणाच्या हंगामातच त्यांनी ही मोठी कामगिरी केली. त्यानंतर 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद जिंकले, हे संघ यापूर्वी देखील चॅम्पियन होते. पण यंदा, म्हणजेच 2025 मध्ये, आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यातील अंतिम सामन्यात 2022 नंतर पहिल्यांदाच एका नवीन चॅम्पियन संघाचा उदय होईल.

आयपीएलच्या 17 हंगामांत, आतापर्यंत 7 संघ चॅम्पियन बनले आहेत. राजस्थान रॉयल्स (2008), डेक्कन चार्जर्स (2009), चेन्नई सुपर किंग्स (2010, 2011, 2018, 2021, 2023), कोलकाता नाइट रायडर्स (2012, 2014, 2024), मुंबई इंडियन्स (2013, 2015, 2017, 2019, 2020), सनरायजर्स हैदराबाद (2016), आणि गुजरात टायटन्स टाइटंस (2022) यांनी विजेतेपद मिळवलं आहे. आता 2025 मध्ये उद्या पंजाब किंवा बंगळुरू कोणताही संघ जिंकला तरी आयपीएलला नवा, 8वा चँपियन मिळेल हे निश्चित.