
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या सोशल मीडियावर आणि मुलाखतींमध्ये त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे खूप चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने एक जुना किस्सा सांगितला, जेव्हा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीशी त्याची फ्लाइटमध्ये बाचाबाची झाली होती. त्याने आफ्रिदीला असं उत्तर दिलं होतं की आफ्रिदी देखील एकदम गप्प झाला होता. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया..
2006 चा पाकिस्तान दौरा, फ्लाइटमधील भांडण
पठाणने नुकतीच लल्लनटॉपला मुलाखत दिली. या दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की, 2006 मध्ये भारतीय संघ सामना खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. कराचीहून लाहोरला जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी एकच फ्लाइट होती. सर्व खेळाडू एकत्र प्रवास करत होते, तेव्हा आफ्रिदीने मस्करी करत इरफानचे केस विस्कटवले होते आणि मजेत त्याला ‘बाळ’ म्हणाला होता.
इरफानला ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि त्याने तात्काळ प्रत्युत्तर देत आफ्रिदीला म्हटलं, “तू कधीपासून माझा बाप झालास?” हे ऐकून आफ्रिदीला खूप राग आला आणि तो इरफान पठाणला शिवीगाळ करू लागला.
“आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं आहे, म्हणूनच तो भुंकतोय…”
या घटनेनंतर तर गोष्ट आणखी वाढली. फ्लाइटमध्ये पठाणने आपल्या शेजारी बसलेल्या पाकिस्तानी अष्टपैलू अब्दुल रझाकला मस्करीत विचारलं की, पाकिस्तानात कोणत्या प्रकारचं मांस मिळतं. रझाकने पठाणला विचारलं की तू असं का विचारतो आहेस आणि मग पाकिस्तानात मिळणाऱ्या वेगवेगळ्या मांसाबद्दल सांगितलं. पण पठाणने शेजारी बसलेल्या आफ्रिदीची मस्करी करत म्हटलं, “इथे कुत्र्याचं मांस पण मिळतं का?”
इरफानने खुलासा केला की हे ऐकून रझाक अवाक् झाला, तर शेजारी बसलेला आफ्रिदी विचारात पडला. त्याचवेळी पठाणने आफ्रिदीला टोमणा मारत म्हटलं, “आफ्रिदीने कदाचित कुत्र्याचं मांस खाल्लं आहे, म्हणूनच तो इतका भुंकतोय.”
आफ्रिदी गप्प झाला
पठाणच्या म्हणण्यानुसार, या टिप्पणीनंतर आफ्रिदी संपूर्ण प्रवासात गप्प राहिला आणि त्याने पठाणशी त्यानंतर बोलणं टाळलं. इरफानने हसत सांगितलं की, “त्याला समजलं की माझ्याशी शाब्दिक युद्धात तो जिंकू शकत नाही. त्यानंतर त्याने मला कधीच काही बोलण्याचा प्रयत्न केला नाही.”