
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकलाय. फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ही ट्रॉफी टीम इंडियाने उचलली, त्यावेळी देशवासियांनी एकच जल्लोष केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील जवळपास 88 हजार प्रेक्षक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. पण एक खास माणूस या मैदानावरील हा सामना पाहू शकला नाही, ते म्हणजे ईशान किशनचे वडील. ईशानने फायनलमध्ये सुंदर अर्धशतक झळकावलं. पण त्याचे वडिल मुलाची ही कामगिरी पाहू शकले नाहीत. कारण फायनलच्या एक दिवस आधी त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्नुसार फायनलच्या एक दिवस आधी ईशान किशनची चुलत बहिण आणि तिच्या पतीचा रस्ते अपघतात मृत्यू झाला. इशानचे वडिल प्रणव पांडे फायनल पाहण्यासाठी अहमदाबादला चाललेले. इशानला त्यांना स्टेडियममध्ये पहायचं होतं. शनिवारी ते अहमदाबादला चाललेले. ते एअरपोर्टवर पोहोचताच त्यांना निधनाची वाईट बातमी मिळाली.
या परिस्थितीतही तो हिम्मत हरला नाही
रिपोर्टनुसार, इशानच्या वडिलांनी अहमदाबादला जायचा प्लान रद्द केला ते सिलीगुडीला रवाना झाले. तिथे हा अपघात झालेला. इशानची बहिण आणि तिचा पती लग्नासाठी चाललेले. त्यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात त्यांची दोन मुलं वाचली. इशानला जेव्हा वडिलांकडून या अपघाताबद्दल समजलं, तेव्हा तो पूर्णपणे कोसळून गेला. त्याला आपल्या बहिणीला शेवटचं पहायचं होतं. पण फायनलमुळे शक्य झालं नाही. मात्र, या परिस्थितीतही तो हिम्मत हरला नाही आणि फायनलसाठी मैदानात उतरला.
पण असं होऊ शकलं नाही
करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा सामना खेळणारा इशान किशन फक्त 25 चेंडूत 54 धावांची तडाखेबंद इनिंग खेळला. त्याच्या या इनिंगने टीम इंडियाला 255 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली. फक्त बॅटिंगच नाही, फिल्डिंगमध्येही इशानने कमाल दाखवली. बाऊंड्री रोखण्यासह 3 शानदार कॅच पकडून टीमच्या विजयात महत्वाचं योगदान दिलं. इशानला वडिलांसमोर यशाचं सेलीब्रेशन करायचं होतं. पण असं होऊ शकलं नाही.