
पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटच्या टप्प्यात भारतीयांचा भ्रमनिरास झाला. त्याचवेळी एक आश्चर्याचा धक्का सुद्धा बसला. भ्रमनिरास म्हणजे नीरज चोप्राच हुकलेलं सुवर्ण पदक आणि आश्चर्याचा धक्का म्हणजे शेजारच्या पाकिस्तानात अर्शद नदीमला मिळालेलं गोल्ड मेडल. नीरज आणि अर्शद दोघेही एकाच क्रीडा प्रकारात आपआपल्या देशाच प्रतिनिधीत्व करत होते, ते म्हणजे जॅवलिन थ्रो. मराठीत या खेळाला भालाफेक म्हणतात. हा प्राचीन खेळ आहे. जॅवलिनचा वापर हा युद्धापासून सुरु झाला. पुढे तो खेळामध्ये बदलला. मागच्या 2020 टोक्यो ऑलिंम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यानंतर जॅवलिन थ्रो च्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नीरजने वर्चस्व गाजवलं. पॅरिस ऑलिम्पिकच्या क्वालिफिकेशन राऊंडमध्येच नीरजचे दमदार सुरुवात केली होती. क्वालिफिकेशनसाठी 84 मीटरची मर्यादा होती. पण नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर अंतरावर थ्रो करुन पहिलं स्थान मिळवलं. त्यामुळे टोक्योप्रमाणे नीरज चोप्रा पॅरिसमध्येही गोल्ड मेडल मिळवणार असा सर्व भारतीयांना विश्वास होता. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम सुद्धा पात्र ठरला. त्याने पहिल्याच प्रयत्नात 86.59 मीटर अंतरावर भाला फेकला. क्वालिफिकेशन राऊंडमधील या प्रदर्शनामुळे कोणालाही असं वाटलं नव्हतं...