Kieron Pollard: मुंबई इंडियन्सचा हेड कोच होताच पोलार्डचा मोठा निर्णय, 24 तासांमध्येच दिला CSK ला धक्का!
Kieron Pollard News: किरॉन पोलार्डने मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद हाती घेतलाच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने थेट सुपर किंग्जला मोठा धक्का दिला आहे.

Kieron Pollard Mumbai Indians Head Coach: किरॉन पोलार्डची नुकतीच मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर लगेचच, पोलार्डने दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीग, एसए२० (SA20) मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या ३९ वर्षीय खेळाडूला लीगच्या लिलावात जोबर्ग सुपर किंग्सने विकत घेतले होते. त्याने सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाला आपल्या अनुपलब्धतेबद्दल कळवले आहे. पोलार्डने दुसऱ्या फ्रँचायझीसाठी खेळण्यास मुंबई इंडियन्सला कोणतीही हरकत नव्हती, असे क्रिकबझने (Cricbuzz) वृत्त दिले आहे.
जोबर्ग सुपर किंग्स ही आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सच्या मालकीची आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्स आणि सर्व सुपर किंग्स फ्रँचायझींचे सीईओ, कासी विश्वनाथन यांनी पोलार्डच्या निर्णयाला दुजोरा दिला. ते म्हणाले, “त्याने आम्हाला कळवले आहे की तो जोबर्ग सुपर किंग्ससाठी खेळू शकणार नाही. आम्ही आता त्याच्या बदली खेळाडूचा शोध घेऊ.”
किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्स सहभागी असलेल्या कोणत्याही लीगमध्ये दुसऱ्या कोणत्याही फ्रँचायझीसाठी खेळलेला नाही. SA20 लिलावात जोबर्ग सुपर किंग्सने पोलार्डला १५ लाख दक्षिण आफ्रिकन रँडमध्ये विकत घेतले. तो गेल्या हंगामापर्यंत एमआय केप टाऊन संघाचा भाग होता, परंतु फ्रँचायझीने लिलावात त्याच्यासाठी बोलीही लावली नाही. त्याऐवजी एमआयने सहकारी वेस्ट इंडियन खेळाडू शिमरॉन हेटमायरला विकत घेतले.
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरोन पोलार्ड २०१० मध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. तो २०२२ पर्यंत या फ्रँचायझीसोबत राहिला. १३ हंगामांमध्ये पोलार्डने संघाला पाच विजेतेपदे जिंकण्यास मदत केली. त्याने २०२३ च्या हंगामापूर्वी आयपीएलमधून निवृत्ती घेतली. पोलार्डच्या जाण्यानंतर मुंबई इंडियन्सने एकही विजेतेपद जिंकलेले नाही. पोलार्डने एमआय केप टाऊनसाठी १२, एमआय न्यूयॉर्कसाठी ३० आणि एमआय एमिरेट्ससाठी २५ सामने खेळले आहेत.
मागील हंगामात मुंबईची कामगिरी अतिशय वाईट पाहायला मिळाली. पुढील हंगामासाठी मुंबईच्या संघात अनेक बदल पाहायला मिळेल अशी शक्यता नाकारता येत नाही. पहिला बदल तर मुख्य प्रशिक्षक बदलून संघाने घेतला आहेच. आता संघ कर्णधारही बदलणार असल्याचे म्हटले जात आहे.