अपयशी राहुलसाठी कोहलीचा हट्ट का?

अपयशी राहुलसाठी कोहलीचा हट्ट का?

सिडनी : दिलेली संधी मातीत कशी घालावी याचं उदाहरण म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल. राहुलचा सध्या सोशल मीडियावरुन समाचार घेतला जातोय. सलग अपयशी ठरल्यानंतरही त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली. पण त्याने याही वेळी तेच केलं, जे अगोदर करत होता. सिडनी कसोटीत केवळ नऊ धावा करुन तो बाद झाला. केवळ सहा चेंडूंचा सामना त्याला करता आला.

भारतीय संघाच्या सलामीवीर जोडीचा परदेशातील हा जानेवारी 2018 पासूनचा सहावा प्रयोग होता. परदेशातील 23 डावांमध्ये भारतीय सलामीवीर जोडीने केवळ 21.56 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. अनेक प्रयोग करुन पाहिल्यानंतरही भारताला चांगली सुरुवात करुन देणारी जोडी सापडलेली नाही. विराट कोहलीने पुन्हा एकदा केएल राहुलवर विश्वास दाखवला होता.

राहुलची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी

अॅडिलेड कसोटी – 2, 44

पर्थ कसोटी – 2, 0

मेलबर्न कसोटी – संघातून वगळलं

सिडनी कसोटी – 9

केएल राहुल सतत अपयशी ठरला आहे. तरीही त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली. सुरुवातीला भारतीय संघाला पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाल्यामुळे मोठा धक्का बसला. उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी मयांक अग्रवालची निवड करण्यात आली. मयांकने दिलेल्या संधीचं सोनं केलं. या कसोटीत त्याने सलामीला येत 77 धावांची खेळी केली.

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण दुखापत झाल्यामुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही. मुरली विजय आणि केएल राहुल यांच्यावर सलामीची जोडी होती. पण एकाही सामन्यात भारताला चांगली सुरुवात करुन देण्यास दोघांना अपयश आलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI