KL Rahul: नशीब असावं तर असं! राहुल एकदा नाही तर दोनदा वाचला, किवींना आता हे भारी पडणार
KL Rahul Wicket: केएल राहुल एकदा नाही तर दोनदा वाचला. भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी किवींना मात्र मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

IND vs NZ Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलचा डाव स्वस्तात संपला असता, पण पंचांनी सुरुवातीला गोलंदाजाची बाजू घेतली आणि नंतर कर्णधारानेही डीआरएस घेण्यास नकार दिला. जेव्हा रिप्ले पाहिला गेला, तेव्हा राहुल बाद झाल्याचे स्पष्ट झाले. संतप्त झालेल्या मॅट हेन्रीने आपली निराशा व्यक्त करण्यासाठी आपला स्वेटर मैदानावर फेकला.
ही संपूर्ण घटना टीम इंडियाच्या डावाच्या सातव्या षटकात घडली. वेगवान गोलंदाज मॅट हेन्री सातवे षटक टाकत होता. षटकातील चौथा चेंडू राहुलच्या पॅडला लागला. दोन आवाज ऐकू आले. मॅट हेन्रीने बाद होण्याची अपील केली. हेन्रीचा विश्वास होता की राहुल बाद झाला आहे आणि त्याची जोरदार अपील तेच दर्शवत होती, पण पंच कुमार धर्मसेनाने ती फेटाळली. कर्णधार टॉम लॅथमने डीआरएस घेण्याच्या शक्यतेवर थोडक्यात चर्चा केली. काही क्षणांपूर्वीच एक रिव्ह्यू गमावल्यामुळे, कर्णधार तो घेण्यास तयार नव्हता. नंतर, जेव्हा रिप्ले पाहिला गेला, तेव्हा असे दिसून आले की चेंडू सरळ रेषेत होता आणि त्यानंतर मधल्या स्टंपला लागला. यामध्ये स्पष्टपणे तीन लाल रेषा दिसत होत्या. याचा अर्थ असा की, जर डीआरएसचा वापर केला असता, तर राहुल बाद झाला असता आणि पॅव्हेलियनमध्ये परतला असता.
जेव्हा हे सर्व घडले, तेव्हा राहुल फक्त पाच धावांवर खेळत होता. जेव्हा मैदानावर मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवण्यात आला, तेव्हा मॅट हेन्रीनेही तो पाहिला आणि तो संतापला. रागाच्या भरात त्याने आपले स्वेटरही जमिनीवर फेकले. यातून त्याची निराशा स्पष्टपणे दिसून आली. यानंतर राहुल आणि जैस्वाल अधिक सावधपणे खेळू लागले आणि त्यांनी न्यूझीलंडला विकेट घेण्याची कोणतीही संधी दिली नाही.
भारतातील पहिल्या डावातील चौथ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर काइल जेमिसनच्या गोलंदाजीवर राहुलला नशिबाची साथ मिळाली. किवीच्या गोलंजदाजाने जोरदार अपिल केले. मैदानावरील अंपायरने नाबाद ठरवल्यानंतर किवी कर्णधार टॉम लेथमने DRS घेतला. मात्र स्निकोमीटरवर चेंडू आधी बॅटला लागला की पॅडला हे समजत नसल्याने अंपायरने ‘Inconclusive’ निर्णय दिला.