Mirabai Chanu : वडिलांची बेताची परिस्थिती पण आईने या गोष्टीतून टॅलेंट हेरलं, ट्रेनिंगसाठी रोज 22 किमी प्रवास करायची; मीराबाई चानूची प्रेरणादायी गोष्ट

Mirabai Chanu Asian Games Medal : 12 वर्षांची असताना जंगलातून घरासाठी प्रचंड वजनाची लाकडं सहज उचलून आणणाऱ्या मीराबाई चानूची ताकद तिच्या आईने सर्वात आधी ओळखली. सुरुवातीला तिरंदाजीकडे तिचा कल होता. मात्र वेटलिफ्टर कुंजरानी देवी यांच्या कामगिरीने प्रेरित होऊन मीराबाईने वेटलिफ्टिंगला करिअर म्हणून निवडलं.

Mirabai Chanu : वडिलांची बेताची परिस्थिती पण आईने या गोष्टीतून टॅलेंट हेरलं, ट्रेनिंगसाठी रोज 22 किमी प्रवास करायची; मीराबाई चानूची प्रेरणादायी गोष्ट
Mirabai Chanu Asian Games Medal
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 23, 2026 | 3:23 PM

जपानमध्ये सध्या एशियन गेम्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेमध्ये रोज विविध पदकं विविध खेळाडू जिंकत आहेत. पण काल भारतीय क्रिकेट संघ्याच्या वाघिणींनी भारताला क्रिकेटमध्ये गोल्ड मिळवून दिलं. कालच्या दिवसभरात त्यांच्याअवतीभोवती काल सर्व दिवसभर घडामोडी सुरु होत्या. त्यांच्या चर्चा अद्याप सुरुच असताना आता भारतासाठी आणखी एक चांगली आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता भारताच्या मीराबाई चानू हिने रौप्य पदक जिंकून 28 वर्षांपासून सुरु असलेला वेटलिफ्टिंगमधील प्रदीर्घ दुष्काळ संपवला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत 1998 नंतर वेटलिफ्टिंगमध्ये आलेल्या या पदकाने कोट्यवधी भारतीय क्रीडाप्रेमींना खऱ्या अर्थाने आनंद साजरा करण्याची संधी दिली. गेल्या जवळपास अडीच दशकांपासून भारत या खेळात पदकासाठी आसुसलेला होता. दरम्यान, 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्य पदकानंतर पुन्हा एकदा मीराबाई प्रकाशझोतात आली. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मीराबाई चानूचा प्रवास इतर खेळाडूंच्या तुलनेत अधिक त्याग, गरिबी आणि संघर्षाने भरलेला आहे.

वजन उचलण्याचा विचार केला तर मीराबाईच्या आईने तिचे हे कौशल्य ओळखले. ती अवघ्या 12 वर्षांची असताना जंगलातून लाकडाची जड मोळी अगदी सहज उचलून घरी आणायची. तिची ही असाधारण शारीरिक क्षमता पाहून तिच्यात ताकदीच्या खेळांसाठी विशेष कौशल्य असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले आणि तिनेच मीराबाईला पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. सुरुवातीला तिला तिरंदाजीची आवड होती, पण नंतर तिने वेटलिफ्टर कुंजराणी हिच्याकडून प्रेरणा घेत तिने वेटलिफ्टिंगची निवड केली.

एकीकडे मीराबाईचे अफाट टॅलेंट होते, तर दुसरीकडे तिच्या वडिलांची गरिबी आणि साधनांची कमतरता. तिचे वडील सायखोम कृती सिंग हे सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ कर्मचारी होते, तर आई सायखोम ओंगबी तोम्बी देवी एक छोटेसे दुकान चालवायची. सहा भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या मीराबाईच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडिलांनी अत्यंत तुटपुंज्या साधनांमध्येही आपल्या मुलीला शक्य ती सर्व मदत केली.

खेळाची निवड केल्यानंतर स्वप्न साकार करण्यासाठी तिला सुरुवातीपासूनच प्रचंड खस्ता खाव्या लागल्या. तिच्या घरापासून ट्रेनिंग सेंटर जवळपास 22 किलोमीटर दूर होते. दररोज जाण्यासाठी भाड्याचे पैसे नसायचे, त्यामुळे वाळू वाहून नेणाऱ्या ट्रक ड्रायव्हरांकडे लिफ्ट मागून ती रोज सरावासाठी जायची. तसेच खेळासाठी आवश्यक असलेला महागडा प्रोटीन डाएट आणि व्यावसायिक वेटलिफ्टिंगचे साहित्य खरेदी करण्यासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिला अगदी साध्या बुटांमध्ये सराव करावा लागला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us