जबरा पाकिस्तानी फॅन, ज्याला धोनी 8 वर्षांपासून तिकीट पाठवतो!

| Updated on: Jun 14, 2019 | 7:18 PM

दोघांची ओळख पाकिस्तानविरुद्धच्या 2011 च्या विश्वचषकातील सेमीफायनलवेळी झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत धोनी आणि या चाहत्याचं प्रेम कायम आहे.

जबरा पाकिस्तानी फॅन, ज्याला धोनी 8 वर्षांपासून तिकीट पाठवतो!
Follow us on

लंडन : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीचे चाहते फक्त भारतातच नाही, तर जगभरातही आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानही याला अपवाद नाही. कराचीमध्ये जन्मलेले मोहम्मद बशीर हे माहीचे जबरा फॅन आहेत. दोघांची ओळख पाकिस्तानविरुद्धच्या 2011 च्या विश्वचषकातील सेमीफायनलवेळी झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत धोनी आणि या चाहत्याचं प्रेम कायम आहे.

मोहम्मद बशीर यांच्या तिकिटाची सोयही धोनीकडूनच केली जाते. रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी शिकागोहून बशीर हे मँचेस्टरला दाखल झालेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे तिकीट नसतानाही ते 6000 किमी प्रवास करुन सामना पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये आले आहेत. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानातील सामना आपल्या चाहत्याला पाहता यावा याची काळजी धोनीने घेतली असेल, याचा त्यांना विश्वास आहे.

शिकागोहून येण्याचा खर्चही तेवढाच आहे. पण धोनीचे आभार मानतो. मला तिकिटासाठी कधीही संघर्ष करावा लागत नाही. धोनीला फोन करुन बोलणं सहसा शक्य नसतं. पण धोनीने आजपर्यंत मला कधीही नाराज केलं नसल्याचं ते सांगतात. धोनीला मी फोन करत नाही, कारण तो व्यस्त असतो, असं बशीर म्हणाले.

धोनीला मी फक्त मेसेज पाठवत असतो. मी इथे (इंग्लंड) येण्यापूर्वीच धोनीने मला तिकिटाविषयी माहिती दिली होती. तो प्रंचड चांगला व्यक्ती आहे. त्याने मोहालीमध्ये 2011 च्या सामन्यात माझ्यासाठी जे केलं, त्याचा कुणी विचारही करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया बशीर यांनी एका वेबसाईटशी बोलताना दिली.