Aishwarya Jadhav Wimbledon : कोल्हापूरच्या ऐश्वर्यानं लंडनमध्ये फडकवला तिरंगा, अंडर-14 चॅम्पियनशीपमध्ये एकमेव भारतीय

| Updated on: Jul 11, 2022 | 1:41 PM

2008 साली जन्मलेली ऐश्वर्या कोल्हापूरच्या पन्हाळ्यातल्या युवलुज गावाची आहे. पण ऐश्वर्याच्या करियरच्या दृष्टीने तिच्या आई-वडिलांनी कोल्हापूरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्याने तिच्या या यशाचं श्रेय कुटुंबाला दिलं आहे.

Aishwarya Jadhav Wimbledon : कोल्हापूरच्या ऐश्वर्यानं लंडनमध्ये फडकवला तिरंगा, अंडर-14 चॅम्पियनशीपमध्ये एकमेव भारतीय
ऐश्वर्या जाधव
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली :  मराठमोळ्या कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हीनं (Aishwarya Jadhav)  भारताचा तिरंगा लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बलडन (Wimbledon) स्पर्धेमध्ये डौलानं फडकवलाय. विशेष म्हणजे ही अभिमानाची बाब असून लंडनमध्ये ऐश्वर्यानं कोल्हापूरसह शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय. अंडर-14 चॅम्पियनशीपमध्ये निवड झालेली ऐश्वर्या एकमेव भारतीय आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऐश्वर्याचा जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या ऍण्ड्रीया सोरानं पराभव केला. ऐश्वर्यानं तिला तगडी लढत दिली. पहिल्या सामन्यात पराभव झाला असला तरी ऐश्वर्याच्या हातात आणखी दोन सामने आहेत. राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये ऐश्वर्यानं हे दोन्ही सामने जिंकले तर तिला पुढच्या राऊंडमध्ये जायचा मार्ग सोपा होऊ शकतो.दरम्यान, कोल्हापूरच्या (Kolhapur) या कन्येनं केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे.

पाहा ऐश्वर्याचा विम्बलडन खेळतानाचा व्हिडीओ

यशाचं श्रेय कुटुंबाला

2008 साली जन्मलेली ऐश्वर्या कोल्हापूरच्या पन्हाळ्यातल्या युवलुज गावाची आहे. पण ऐश्वर्याच्या करियरच्या दृष्टीने तिच्या आई-वडिलांनी कोल्हापूरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्याने तिच्या या यशाचं श्रेय कुटुंबाला दिलं आहे. वयाच्या पाचव्या वर्षी ऐश्वर्याने हातात रॅकेट घेतली होती. यानंतर नवव्या वर्षी तिने स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तिने विजय मिळवले.

ऐश्वर्याविषयी खास

  1. विम्बलडन स्पर्धा सुरू होण्याआधी ऐश्वर्याने 4 ते 6 जुलैदरम्यान विशेष ट्रेनिंग कॅम्पमध्येही सहभाग नोंदवला.
  2. अखिल भारतीय टेनिस महासंघाची नंबर एक खेळाडू असलेली ऐश्वर्या विम्बलडननंतर बेल्जियम, पॅरिस आणि जर्मनीमध्येही युरोप ज्युनिअर टेनीस स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.
  3. 2021 च्या सुरूवातीला ऐश्वर्या भारतातल्या अंडर-14 युवती वर्गात 94व्या क्रमांकावर होती, पण एका वर्षाच्या आतच तिने मोठी उडी घेत सातवा क्रमांक गाठला होता.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील ऐश्वर्या जाधवच्या कामगिरीची दखल घेतली होती. यासंबंधिच ट्विट त्यांनी केलंय होतं.

संजय राऊतांनी काय म्हटलं होतं? ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

कशी झाली निवड?

दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय टेनिस असोसिएशन म्हणजेच एआयटीएफने 14 वर्षांखालच्या मुलींची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जागतिक खेळाडूही सहभागी झाले होते. या स्पर्धेत ऐश्वर्याने चार मॅच जिंकून सेमी फायनलमध्ये धडक मारली होती, पण तिला फायनल खेळता आली नाही. या कामगिरीच्या जोरावर ऐश्वर्याची विम्बलडनसाठी निवड झाली.