Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फायनलमध्ये महेंद्र गायकवाडचा धुव्वा उडवत पटकावली मानाची गदा

Harshawardhan Sadgir vs Mahendra Gaikwad Maharashtra Kesari Final Match Result : हर्षवर्धन सदगीर हा 68 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा सातवा कुस्तीपटू ठरला आहे.

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फायनलमध्ये महेंद्र गायकवाडचा धुव्वा उडवत पटकावली मानाची गदा
harshawardhan sadgir clinch maharashtra kesari
Image Credit source: @mohol_murlidhar x account
| Updated on: Mar 22, 2026 | 9:44 PM

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे. हर्षवर्धन सदगीर याने पुण्यातील वाघोलीत झालेल्या अंतिम सामन्यात सोलापुरच्या महेंद्र गायकवाड याचा धुव्वा उडवत ही मानाची चांदीची गदा पटकावण्याची कामगिरी केली आहे. हर्षवर्धनने महेंद्र याच्यावर 4-2 अशा फरकाने विजय मिळवला. यासह हर्षवर्धनची महाराष्ट्र केसरी गदा पटकावण्याची ही एकूण दुसरी वेळ ठरली. हर्षवर्धन दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी गदा जिंकणारा एकूण सातवा कुस्तीपटू ठरला. तर महेंद्र गायकवाड याचं यंदाही महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न भंग झालं.

हर्षवर्धन आणि महेंद्र हे दोघेही काकासाहेब पवार यांचे शिष्य असल्याने कोण जिंकणार? याची उत्सूकता चाहत्यांना होती.  मात्र हर्षवर्धनने अंतिम सामन्यातील अनुभव आणि डावपेचांच्या जोरावर कमाल केली. तर महेंद्र पुन्हा एकदा अपयशी ठरला.  दोघांमधील हा सामना गादी कुस्ती प्रकारात खेळवण्यात आला. जवळपास 11 ते 13 मिनिटं सामन्याचा थरार रंगला.

पहिल्या फेरीत दोघांनाही 1-1 गुण

महेंद्रने आक्रमक होत 1 गुण मिळवला आणि आपलं खातं उघडलं. महेंद्रने हा आक्रमकपणा कायम ठेवत दुसरा गुण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षवर्धनने महेंद्रचा डाव उलटावून लावला. हर्षवर्धनने 1 गुण मिळवला. त्यामुळे दोघांचेही समसमान गुण झाले. अशाप्रकारे पहिली फेरी 1-1 ने बरोबरीत राहिली.

पहिली फेरी बरोबरीत राहिल्याने आता पुढील फेरीत काय होतं याची उत्सूकता कुस्तीप्रेमींना लागून होती. मात्र हर्षवर्धन या अंतिम फेरीत यशस्वी ठरला. हर्षवर्धनने मानाच्या चांदीच्या गदेवर आपली मोहोर उमटवली. हर्षवर्धन जिंकताच मॅटवर त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली. हर्षवर्धनला त्याच्या चाहत्यांनी त्याला खांद्यावर उचलून घेतलं आणि जल्लोष केला.

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला काय काय?

हर्षवर्धनला या विजयानंतर चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच हर्षवर्धनला 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच हर्षवर्धनाला फॉच्युनर गाडी देऊन सन्मानित केलं गेलं. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याचा 4 लाख रुपयांचा धनादेश आणि स्कॉर्पियो गाडी देण्यात आली.

तसेच माती आणि गादी विभागातील विविध वयोगटातील सूवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूंना एकूण 18 बुलेट देण्यात आल्या. तसेच रौप्यपदक विजेत्या कुस्तीपटूंना स्प्लेंडर बाईक देण्यात आली.

मुकेश सदगीर यांची प्रतिक्रिया

दरम्यान हर्षवर्धन याच्या विजयानंतर त्याचे वडील मुकेश सदगीर यांनी प्रतिक्रिया दिली. “कुस्तीचा खेळ आहे, कुणा एकाला पराभूत व्हावं लागतं. दोघेही काका पवारांच्या तालमीतले आहेत. हर्षवर्धनचं डबल केसरी व्हायचं असं स्वप्न होतं. आता तो ट्रिपल केसरी होण्याची तयारी करणार आहे”, असं मुकेश सदगीर म्हणाले.

Follow Us