FIFA World Cup 2026 : भारताकडून खेळण्याची वडिलांची इच्छा अपूर्ण, मुलगा वर्ल्डकप खेळून करणार पूर्ण
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न खेळाडूंचं सोडा, देशांचं पण असतं. अनेक देश अजूनही एकदाही वर्ल्डकप स्पर्धेत पात्र ठरू शकलेले नाही. भारतही त्या देशांपैकी आहे. असं असताना भारतीय वंशाचा फुटबॉलपटू तहसीन मोहम्मद जमशेद याला कतर संघात निवडलं आहे. त्याचे वडील फुटबॉलपटू होते आणि त्यांचं भारताकडून खेळण्याचं स्वप्न होतं.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत 48 संघ भाग होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरू शकलेला नाही. त्यामुळे कोट्यवधी फूटबॉलप्रेमींचा हिरमोड झाला आहे. असं असताना भारतीय वंशाचा फुटबॉलपटू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. कतर देशाच्या संघात भारतीय वंशाच्या तहसीन मोहम्मद जमशेद याची निवड झाली आहे. त्याला 26 सदस्यीय संघात सहभागी करून घेतलं आहे. 2006 नंतर म्हणजेच 20 वर्षानंतर भारतीय वंशाचा खेळाडू फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार आहे. 2006 साली विकास धोरासू फ्रान्स संघाकडून खेळला होता. आता तहसीन मोहम्मद जमशेद हा फुटबॉल वर्ल्डकप खेळणारा दुसरा भारतीय वंशाचा खेळाडू आहे.
तहसीन वडिलांचं स्वप्न करणार पूर्ण
तहसीन मोहम्मद जमशेदचे वडील केरळच्या कोझिकोड येथे राहणारे आहेत. ते एक फुटबॉलपटू होते. पण त्यांचं भारतासाठी खेळण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं. वडिलांची भारतासाठी खेळण्याची इच्छा अपूर्ण राहिली असली तरी त्यांचा 19 वर्षीय मुलगा फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळून पूर्ण आहे. फुटबॉलच्या मोठ्या व्यासपीठावर त्यांचा मुलगा इतिहास रचणार आहे. 1992 मध्ये तहसीनच्या वडिलांची भारतीय युवा फुटबॉल संघात निवड झाली होती. त्यावेळेस ते फुटबॉलपटू पॉल अंचेरीसोबत खेळायचे. पण विश्वविद्यालयीन सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघात खेळण्याचं स्वप्न भंगलं.
तहसीनच्या वडील 1996 मध्ये पत्नी शाइमाकेसोबत कतरमध्ये आले. या काळात तहसीनचे वडील तिथल्या लोकल मैदानात मित्रांसोबत खेळायचे. तेव्हा चार वर्षांचा तहसीन डग आऊटमध्ये बसून वडिलांना खेळताना पाहायचा. तेव्हापासून त्याच्या मनात फुटबॉलप्रेम जागत गेलं आणि फुटबॉलपटू झाला. तहसीन महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा चाहता आहे. कतर ब गटात असून यात बोस्निया आणि हर्झेगोविना, कॅनडा आणि स्वित्झर्लंड हे संघ आहेत. या संघांना मात देऊन कतर पुढच्या फेरीत गेला तर ख्रिस्तियानो रोनाल्डो असलेल्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकते.
2017 मध्ये तहसीनची अल-दुहैल एससीच्या सब-ज्युनियर संघात निवड झाली. अल-दुहैलमध्ये, त्याला मार्को वेराट्टी आणि फिलिप कौटिन्हो यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत वेळ घालवण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. 2023 आणि 2024 मध्ये कतारच्या 17 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील संघांसाठी खेळला. तर अफगाणिस्तानविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता सामन्यात कतारसाठी वरिष्ठ संघात पदार्पण केले.