
मुंबईतील परळ विभागात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मुळची पुंरदरची असलेल्या कांदबरी राऊन हिने चमकदार कामगिरी केली आहे. कादंबरीने राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली आहे. कांदबरीने सबज्युनिअर गटातील ‘स्कॉट’ तब्बल 197.5 किलो वजन उचलत नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कांदबरीने या कामगिरीसह सुवर्ण पदक पटकावलं आहे. महाराष्ट्र राज्य, सब ज्युनियर, ज्युनियर, मास्टर पुरूष आणि महिला पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भोईवाडा इथं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
कादंबरीची या कामगिरीसह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडही करण्यात आली आहे. पंजाब येथे राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेला पटियाला येथे 16 जूनपासून सुरुवात होणार आहे. कादंबरीची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाल्याने कुटुंबिय आणि प्रशिक्षकही आनंदी आहेत. तसेच कादंबरीचं सुवर्ण कामगिरीसाठी तिचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे.
कांदबरीच्या या सुवर्ण यशामागे तिची अफाट मेहनत आहे. कादंबरीने अभ्याससह पॉवर लिफ्टिंगचा दररोज न चुकता सराव केला. अनेकदा अभ्यास आणि खेळ यात समतोल राखताना अनेकांची तारांबळ उडते, मात्र कांदबरीने अभ्यासाचा ‘खेळ’ होऊ न देता दोन्हीकडे योग्य लक्ष दिलं. कादंबरीने आपल्या या यशाचं श्रेय तिचे आई-वडील, कुटुंबिय आणि प्रशिक्षकांना दिलं आहे.
आता कादंबरीकडून पटियाला येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत जोरदार कामगिरीची आशा आहे. कांदबरी तीचे प्रशिक्षक पी बाकीराज यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धेत तिचं नशिब आजमवणार आहे. तसेच कादंबरीला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यामुळे आता या राष्ट्रीय स्पर्धेतही कादंबरीकडून अशाच प्रकारे सुवर्ण पदकाची आशा तिच्या प्रशिक्षक आणि कुटुंबियांना असणार आहे.