Paris Olympics 2024: हॉकी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 52 वर्षांनंतर ऐतिहासिक विजय, कांगारुंवर 3-2 ने मात

Hockey Team India: हॉकी टीम इंडियाने ऑलिम्पिक स्पर्धेत 1972 नंतर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्यात यश मिळवलं आहे.

Paris Olympics 2024: हॉकी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 52 वर्षांनंतर ऐतिहासिक विजय, कांगारुंवर 3-2 ने मात
hockey team india paris olympics 2024
| Updated on: Aug 02, 2024 | 7:42 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी टीम इंडियाने इतिहास रचला आहे. हॉकी टीम इंडियाने हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑलिम्पिकमध्ये 1974 साली अखेरचा विजय मिळवला होता. त्यानंतर आता 2024 साली मात करत 52 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. टीम इंडियाने कांगारुंचा 3-2 ने धुव्वा उडवला. भारताचा हा पूल बी मधील पाचवा आणि शेवटचा सामना होता. भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत साखळी फेरीतील तिसरा विजय मिळवला. आता थोड्याच वेळात भारताचा क्वार्टर फायनलमध्ये कुणाविरुद्ध सामना होणार? हे स्पष्ट होईल.

टीम इंडियाकडून हरमनप्रीत सिंह याने पुन्हा एकदा कर्णधारपदाला साजेशी भूमिका बजावली. हरमनप्रीतने सर्वाधिक 2 गोल केले. तर अभिषेकने 1 गोल केला. तर ऑस्ट्रेलियाकडून थॉमस क्रेग आणि ब्लेक गोवर्स या दोघांनी प्रत्येकी 1-1 गोल केला. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या क्षणी आणखी एक गोल करुन सामना बरोबरीत सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र टीम इंडियाच्या खेळाडूंनी यशस्वीपणे आघाडी कायम राखून विजय मिळवण्यात यश मिळवलं.

टीम इंडियाने दुसऱ्या सत्रात 2-0 ने एकतर्फी आघाडी घेतली. अभिषेकने 12 व्या मिनिटाला गोल केला. कॅप्टन हरमनप्रीत सिंहने 13 व्या मिनिटाला गोल (पेन्लटी कॉर्नर) केला. कांगांरुनी पहिल्या सत्रात गोल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र भारताचा गोलकीपर पीआर राजेश याने शानदार पद्धतीने आपली भूमिका पार पाडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून 25 व्या मिनिटाला थॉमस क्रेग याने गोल केल्याने ऑस्ट्रेलियाने खातं उघडलं. ज्यामुळे भारताची आघाडी 1 ने कमी होईन 2-1 अशी झाली.तिसऱ्या सत्रात हरमनप्रीतने पेनल्टी स्ट्रोकद्वारे गोल केल्याने भारताने पुन्हा 2 ने आघाडी मिळवली. भारताचा स्कोअर 3-1 असा झाला. त्यानंतर कांगारुंनी शेवटच्या सत्रात गोल केला. कांगांरुसाठी ब्लॅक गोवर्स याने गोल केल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. मात्र भारताने आघाडी कायम राखत विजय मिळवला.

हॉकी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 52 वर्षांनी विजय

दरम्यान टीम इंडियाने या विजयासह पूल बीमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला. भारताने 1 सामना हा गमावला तर एक सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 3-2 फरकाने विजय मिळवला. अर्जेंटीना विरुद्धचा सामना 1-1 ने बरोबरीत राहिला. आयर्लंडवर 2-0 एकतर्फी फरकाने मात केली. चौथ्या सामन्यात बेल्जियमने 1-2 ने पराभूत केलं. त्यानंतर आता कांगारुंना 3-2 ने लोळवलंय.

टीम इंडिया पूल बीमध्ये दुसऱ्या स्थानी

कॅप्टन हरमनप्रीतचा ‘सिक्स’

दरम्यान कॅप्टन हरमनप्रीतने आतापर्यंत या साखळी फेरीतील 5 सामन्यांमध्ये 6 गोल केले. हरमनप्रीतने न्यूझीलंड आणि अर्जेंटिना विरुद्ध प्रत्येकी 1-1 गोल केले. तर आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध डबल धमाका केला.