Video : ख्रिस्तियानो रोनाल्डोची एक कृती, कोका-कोला कंपनीला अब्जावधींचा फटका

| Updated on: Jun 16, 2021 | 4:11 PM

ख्रिस्तियानो रोनाल्डो याला सध्या जागतिक फुटबॉलमधील सर्वोत्कष्ट खेळाडूसह एक फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखलं जात. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कृतीवर फॅन्सची करडी नजर असते.

Video : ख्रिस्तियानो रोनाल्डोची एक कृती, कोका-कोला कंपनीला अब्जावधींचा फटका
ख्रिस्तियानो रोनाल्डो
Follow us on

बुडापेस्ट : पोर्तुगालच्या फुटबॉल संघाचा कर्णधार आणि सध्या जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोची एक कृती प्रसिद्ध कोको कोला कंपनीला चांगलीच महागात पडली आहे. सध्या युरो चषक 2020 सुरु असून सुरुवातीच्या सामन्यातच पोर्तुगालने हंगेरीवर 3-0 च्या फरकाने दमदार विजय मिळवला. दरम्यान सामन्यापूर्वी रोनाल्डोने पत्रकार परिषदेत कोका कोलाच्या बाटल्यांना बाजूला करत पाण्याची बॉटल वर केली. त्याच्या या एका कृतीमुळे कोका कोला कंपनीला तब्बल 4 बिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांनुसार सुमारे 29 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. (Portugal Captain Cristiano Ronaldo One Video in Euro 2020 makes Coca Cola Company lose Of 4 Billion Dollar Company Shares Fall in Stock market)

रोनाल्डो संघ पोर्तुगाल युरो चषकात ग्रुप एफमध्ये खेळत आहे. मंगळवारी हंगेरीविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोनाल्डो पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला होता. त्यावेळी त्याच्या समोर कोका कोला हे शीतपेय भरलेल्या कोका कोलाच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. रोनाल्डोने हे पाहताच त्या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बॉटल उचलत प्रेक्षकांकडे दाखवत पाणी असं म्हणाला. यातून त्याने कोका कोलासारख्या पेयांपेक्षा पाणीच सरस असल्याचं दाखवलं. त्याच्या याकृतीमुळे कोका कोला कंपनीला काही तासांच्या आतच 29 हजार कोटींचं नुकसान झालं.

कसं झालं इतक नुकसान?

रोनाल्डोचा कोका कोलाच्या बाटल्यांना बाजूला करुन पाण्याची बॉटल वर करण्याचा व्हिडीओ जसा व्हायरल झाला तसं कोका कोला कंपनीचे शेअर धाडकन कोसळले. युरोपमध्ये शेअर बाजार उघडला तेव्हा कोका-कोलाचे शेअरची किंमत 56.10 अमेरिकी डॉलर होती. रोनाल्डोचा व्हिडीओ व्हायरल होताच शेअर्सची किंमत 1.6 ने घसरुन 55.22 डॉलरवर आली. ज्यामुळे कंपनीला काही तासांच्या आतच 4 बिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांनुसार 29 हजार कोटींचं नुकसान झालं.

रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी

मंगळवारी हंगेरीविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने पोर्तुगालला विजय मिळवून देत स्वत:ही अनेक रेक़ॉर्ड नावावर केले. रोनाल्डो युरो चषक स्पर्धेत 5 वेळा खेळणारा सर्वांत पहिला खेळाडू ठरला. तसेच पाचही स्पर्धांमध्ये गोल करणारा ही रोनाल्डो पहिलाच खेळाडू ठरला आहे. सोबतच त्याने 87 व्या मिनिटाला पेनल्टीच्या मदतीने त्याचा पहिला आणि संघासाठी दुसरा गोल केला. याच गोलबरोबर युरो चषक स्पर्धेच्या इतिहासात रोनाल्डोचे 10 गोल झाले. त्यामुळे फ्रान्सचा माजी दिग्गज खेळाडू मिशेल प्लाटिनीचा (Michel Platini) 9 गोलचा रेकॉर्ड तोडून रोनाल्डो युरोमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. रोनाल्डोने सामन्यात आणखी एक गोल केल्याने त्याच्या नावे 11 गोल आहेत. विशेष म्हणजे पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात 106 गोल रोनाल्डोने केले असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. सोबतच एकाच सामन्यात 2 गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडूही रोनाल्डोच आहे. त्याने 36 वर्ष 130 दिवसांचा असताना मंगळवारी दोन गोल केले. याआधी हा रेकॉर्ड यूक्रेनच्या शेवचेंको याच्या नावावर होता. त्याने 2012 मध्ये 35 वर्षे 256 दिवसांचा असताना एकाच सामन्यात दोन गोल केले होते.

हे ही वाचा :

Euro 2020 : रोनाल्डो ठरला Successful, एकाच सामन्यात चार दमदार विक्रम नावावर

Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

(Portugal Captain Cristiano Ronaldo One Video in Euro 2020 makes Coca Cola Company lose Of 4 Billion Dollar Company Shares Fall in Stock market)