प्रो बास्केटबॉल लीगच्या पाचव्या पर्वाची घोषणा, असं असेल वेळापत्रक

प्रो बास्केटबॉलच्या पाचव्या पर्वाची गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर या पर्वाची घोषणा झाली असून डिसेंबरमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. चला जाणून घेऊयात संपूर्ण माहिती...

प्रो बास्केटबॉल लीगच्या पाचव्या पर्वाची घोषणा, असं असेल वेळापत्रक
प्रो बास्केटबॉल लीगच्या पाचव्या पर्वाची घोषणा, असं असेल वेळापत्रक
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 09, 2025 | 3:56 PM

प्रो बास्केटबॉलच्या मागच्या चार पर्वांना चाहत्यांची भरभरून दाद मिळाली. त्यामुळे पाचव्या पर्वाची उत्सुकता होती. अखेर यावरचा पडदा दूर झाला असून ही ही लीग 13 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित केली जाईल.या 11 दिवसांत एकूण 44 सामने खेळवले जातील. नवी मुंबईतील वाशी येथील फॉर्च्यून हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन अनुरुद्ध पोळ (संचालक, एबीसीएफएफ लीग प्रायव्हेट लिमिटेड) आणि युवा आयकॉन रणवी विजय सिंग यांनी केले. या स्पर्धेचं पाचवं पर्व सर्वात मोठं आणि सर्वात खास ठरणार आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. या स्पर्धेत एकूण 13 संघांचा समावेश होणार आहे. यात आठ पुरुष आणि पाच महिला संघ असेल. पहिल्यांदाच महिला संघाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे पर्व अधिक समावेशक आणि प्रेरणादायी झालं आहे.

प्रत्येक सामना हा 1 तासांचा असेल. प्रेक्षकांना दररोज सहा तासांचे लाईव्ह बास्केटबॉल अॅक्शन पाहता येईल. सर्व सामने उच्च दर्जाच्या प्रसारण सुविधांनी सुसज्ज असलेल्या इनडोअर स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. यात पुण्यातील राजाराम भिकू पठारे स्टेडियमची मुख्य स्थळ म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा लिलाव देखील केला जाईल. यामुळे संघांना त्यांच्या रणनीतीनुसार खेळाडू निवडता येतील. तसेच खेळाडूंना त्यांना पात्र असलेली ओळख आणि आदर मिळेल. या वर्षीच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रक्षा खडसे आणि बॉलीवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन सुनील शेट्टी हे प्रमुख पाहुणे असतील.

अनुरुद्ध पोळ यांनी सांगितलं की, “सीझन 5 हा प्रो बास्केटबॉल लीगसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. महिला संघांना जोडून आम्ही समान संधी आणि प्रेरणादायी व्यासपीठ तयार केले आहे. आमचे उद्दिष्ट महाराष्ट्राला भारतीय बास्केटबॉलचे केंद्र बनवणे आहे आणि हा हंगाम त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.” तर रणविजय सिंह यांनी सांगितलं की, “बास्केटबॉल हा खेळ थेट तरुणांशी जोडला जातो. या लीगचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे. हे पर्व प्रतिभा, उत्साह आणि मनोरंजनाने भरलेलं असेल.”