फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या तिकीट विक्रीत तांत्रिक चूक आणि फुटबॉल चाहत्यांना मिळाला फुकटात पास, आता…

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेच्या सामन्यांच्या तिकिटांसाठी फुटबॉलप्रेंमींची झुंबड उडाली आहे. पण एक तांत्रिक चूक झाली आणि काही फुटबॉलप्रेमींना पैसे न देताच पास मिळाले आहेत. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात...

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या तिकीट विक्रीत तांत्रिक चूक आणि फुटबॉल चाहत्यांना मिळाला फुकटात पास, आता...
फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या तिकीट विक्रीत तांत्रिक चूक आणि फुटबॉल चाहत्यांना मिळाला फुकटात पास, आता...
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 05, 2026 | 7:57 PM

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धांपैकी एक आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या या स्पर्धेची फुटबॉलप्रेमी चातकासारखी वाट पाहात असतात. त्यामुळे स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात आहे आणि तिथे कसं जायचं आणि सामने पाहायचे याचं नियोजन सुरू होतं. आता फुटबॉल स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी चाहत्यांची आपआपल्या देशाचे सामने पाहण्यासाठी झुंबड उडाली आहे. त्यासाठी योग्य रक्कम मोजून सामने पाहण्याचं नियोजन केलं जात आहे. असं असताना फिफाच्या तिकीट विक्री साईटवर चेकआऊट एरर आल्याने जवळपास 60 फुटबॉलप्रेमींना स्पर्धेची तिकीटं फुकटात मिळाली. आता फिफान या चाहत्यांकडून तिकीटाचे पैसे मागितलं आहे. वेबसाईटवरील एक तांत्रिक बिघाडामुळे चाहत्यांना शून्य यूएस डॉलरमध्ये तिकीटं मिळाली. फिफाने स्पष्ट केलं की, तिकिटांचं आरक्षण कायम राहिल, पण त्याची रक्कम मोजावी लागणार आहे.

फिफाने एक्सवर स्पष्ट केलं की, ‘फिफाने माहिती घेतली आहे की, मागील पेमेंटमधील समस्येमुळे बुधवार, 3 जून रोजी चेकआउट प्रक्रियेदरम्यान अंदाजे 60 फिफा विश्वचषक 2026 चाहत्यांना विनाशुल्क (0 USD) तिकिटे देण्यात आल्याची सूचना मिळाली आहे.’ फिफाने या चुकीसाठी माफी मागितलं आहे. इतकंच काय तर फिफाने चाहत्यांना पासचं पूर्ण पैसे भरण्यासाठी किंवा बुकिंग रद्द करण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला आहे. निर्धारित वेळेत पैसे न भरल्यास तिकीटं आपोआप रद्द केली जातील. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या तिकीट दरावरून आधीच चाहत्यांमध्ये नाराजी आहे. त्यात हा वाद समोर आल्याने क्रीडाप्रेमी चांगलेच संतापले आहेत. यंदाच्या फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद अमेरिका मॅक्सिको आणि कॅनडाकडे आहे. ही स्पर्धा 11 जून ते 19 जुलैदरम्यान आहे.

दरम्यान, फिफाने अंतिम सामन्याच्या तिकिटाची सर्वोच्च किंमत ही 10,990 अमेरिकन डॉलरपर्यंत वाढवली आहे. सध्याची डॉलरची किंमत पाहता हि रक्कम जवळपास 10 लाख 47 हजार रुपये आहे. म्हणजे एका तिकीटासाठी इतके रुपये मोजावे लागणार आहेत. डिसेंबरमध्ये वेळापत्रक जाहीर झालं तेव्हा ही किंमत 8,680 अमेरिकन डॉलर होती. त्यापूर्वी 2022 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यांची तिकीटं 70 ते 1600 अमेरिकन डॉलरच्या मध्ये होती.

Follow Us