World Championship: भालाफेकपटू नीरज चोप्राची कमाल, एका थ्रोमध्येच गाठली अंतिम फेरी

वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने दोन वर्षांपूर्वी सुवर्ण पदकाची कमाई केली होती. आता पुन्हा एकदा नीरज चोप्रा सुवर्ण पदकाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे.

World Championship: भालाफेकपटू नीरज चोप्राची कमाल, एका थ्रोमध्येच गाठली अंतिम फेरी
भालाफेकपटू नीरज चोप्राची, एका थ्रोमध्येच गाठली अंतिम फेरी
Image Credit source: PTI
Updated on: Sep 17, 2025 | 5:14 PM

जपानमधील टोकियो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 बुधवार पुरुषांच्या भालाफेकीची पात्रता फेरी झाली. वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने कमाल केली. अंतिम फेरीसाठी एकूण 12 स्थान असून अ आणि ब गट आहे. नीरज चोप्रा गट अ मध्ये होता. या गटात चांगली कामगिरी करून त्याने अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. अंतिम फेरीत नीरज चोप्राला फक्त एक थ्रोमध्ये जागा मिळाली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 84.85 मीटर अंतर पार करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत पात्रतेसाठी 84.50 मीटर अंतर कापणं आवश्यक होतं. जेव्हा नीरजची पाळी आली तेव्हा त्याच्या ट्रेडमार्क शैलीत फक्त एका थ्रोने काम पूर्ण केले. त्यानंतर नीरजने पुन्हा थ्रो केला नाही. अंतिम फेरीसाठी त्याची ऊर्जा वाचवण्याचा निर्णय घेतला. तर जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि पोलंडचा डेव्हिड वेगनर हे देखील पात्र ठरले आहेत. नीरज चोप्राच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतर या दोन भालाफेकपटूंनी त्याच्या पुढचं अंतर थ्रो करत कापलं. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने दुसऱ्या प्रयत्नात 87.21 मीटर अंतर कापलं. तर पोलंडचा डेव्हिड वेगनर याने तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात 85.67 मीटर अंतर कापत अंतिम फेरीत जागा मिळवली.

ब गटात 18 जणांमध्ये ऑलिंपिक चॅम्पियन अर्शद नदीम, अँडरसन पीटर्स, ज्युलियस येगो, लुईझ दा सिल्वा, रोहित यादव, यशवीर सिंग आणि उदयोन्मुख श्रीलंकेचा रुमेश थरंगा पाथिरागे यांचा समावेश असेल. त्यामुळे अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी या गटातून पात्र होणं आवश्यक आहे. अर्शद नदीम हा या फेरीतून पात्र झाला तर पु्न्हा एकदा भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळू शकतो. ब गटात पात्रता फेरीत दोन भारतीय खेळाडू आहेत. यश वीर सिंग आणि रोहित यादव अशी त्यांची नावे आहेत.

भारताचा सचिन यादव देखील या गटातून अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा करत होता. सचिन यादवने 80.16 मीटर, 83.67 मीटर, 82.63 मीटर असे तीन थ्रो केले. तो 84.50 मीटरचा पात्रता मार्क ओलांडू शकला नाही. ग्रुप अ मध्ये सहाव्या स्थानावर राहिला.  अंतिम फेरीसाठी टॉप 12 थ्रोअर्स पात्र ठरतात. तो पात्र ठरेल की नाही हे आता इतर स्पर्धकांवर म्हणजेच गट बवर अवलंबून आहे. पण नीरज चोप्रा पात्र ठरला असून त्याच्याकडून क्रीडाप्रेमींना सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.