
बाबर आजम पाकिस्तान क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज आहे. पण बऱ्याच काळापासून तो विशेष कमाल दाखवू शकलेला नाही. पण सततच्या खराब प्रदर्शनादरम्यान बाबर आजमने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. मागच्या काही महिन्यांपासून बाबर आजम पाकिस्तानच्या टी 20 टीम बाहेर होता. नुकतचं त्याने या फॉर्मेटमध्ये पुनरागमन केलय. या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो ठरलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात बाबर आजम फ्लॉप ठरला. बाबरने दुसऱ्या टी 20 सामन्यात माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माचा सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.
शुक्रवारी 31 ऑक्टोंबरला लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा टी 20 सामना झाला. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम 110 धावांवर ढेपाळली. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी सोपं लक्ष्य मिळालं. पाकिस्तानने वेगवान सुरुवात करत 54 धावांची ओपनिंग भागीदारी केली. त्यानंतर बाबर आजमची क्रीजवर एन्ट्री झाली. टीममधून बाहेर होण्याआधी बाबर आजम नेहमीच ओपनिंगला यायचा. पण पुनरागमनानंतर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय.
रोहितला मागे टाकून बाबर बनला नंबर 1
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुद्धा बाबर आजम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला व त्याने चौकार मारला. बाबरने 9 वी धाव घेताच रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. बाबर आता टी 20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलाय. रोहितच्या नावावर 4231 धावा होत्या. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी बाबरला 9 धावांची गरज होती. बाबरने ते साध्य केलं. बाबरने 130 व्या सामन्यात हा रेकॉर्ड मोडला. तो आता सर्वाधिक धावांच्या बाबतीत वर्ल्ड नंबर 1 बनला आहे.
टेस्ट सारखी बॅटिंग
हा रेकॉर्ड मोडण्यासाठी सुद्धा बाबरला खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्याने टी 20 मॅचमध्ये टेस्ट क्रिकेटसारखी बॅटिंग केली. बाबरने या सामन्यात नाबाद 11 धावा केल्या. पण त्या 11 धावांसाठी 18 चेंडू खर्ची घातले. बाबर जेव्हा क्रीजवर उतरलेला तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी 57 धावांची गरज होती. टीमच्या विजयात बाबरच योगदान फक्त 11 धावांच होतं.
पाकिस्तानच्या साइम अयूबची स्फोटक बॅटिंग
पाकिस्तानने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेला 19.2 ओव्हर्समध्ये 110 धावांवर ऑलआऊट केलं. त्यांचा ऑलराऊंडर फहीम अशरफवने सर्वाधिक 4 विकेट काढले. सलमान मिर्झाने 3 विकेट घेतल्या. पाकिस्तानचा युवा ओपनर साइम अयूबच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर 13.1 ओव्हरमध्ये मॅच जिंकली. अयूबने फक्त 38 चेंडूत 71 धावा फटकावल्या. यात 6 फोर आणि 5 सिक्स आहेत.