
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टुर्नामेंटमध्ये भारताचा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध झाला. 23 फेब्रुवारीला ही मॅच झाली. या मॅचमध्ये टीम इंडियाने आरामात विजय मिळवला. पण या मॅचमध्ये एका पाकिस्तानी खेळाडूने विकेट घेतल्याच विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं. या घटनेनंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. आता या पाकिस्तानी खेळाडूला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. आता त्याने जे सेलिब्रेशन केलं, त्या बद्दल माफी मागितली आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यात स्टार फलंदाज शुभमन गिल 52 चेंडूत 46 धावांची इनिंग खेळून आऊट झाला होता. पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदने त्याला बोल्ड केलं होतं. हा विकेट घेतल्यानंतर अबरार अहमदने विकेटचे सेलिब्रेशन करताना आपली मान फिरवून गिलला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला होता. त्याच्या डोळ्यातही जोश दिसत होता. ही आपल्या सेलिब्रेशनची स्टाइल आहे, असं अबरार अहमद म्हणतो.
‘कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता’
“ही माझी स्टाईल आहे. मी त्यात काही चुकीच केलेलं नाही. मी काही चुकीचं केलय असं मला कुठल्या मॅच अधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं नाही. मात्र, तरीही कोणी दुखावलं गेलं असेल, तर मला या बद्दल खेद आहे. मी माफी मागतो. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता” असं अबरार अहमद टेलीकॉम एशिया स्पोर्टशी बोलताना म्हणाला.
विराट कोहलीला डिवचल्याचा खुलासा
अबरार अहमदने हा सुद्धा खुलासा केला की, त्याने मॅच दरम्यान विराट कोहलीला सिक्स मारण्यासाठी चिथावणी दिली होती. “विराट कोहलीला गोलंदाजी करण्याच माझं बालपणीच स्वप्न दुबईमध्ये पूर्ण झालं. हे खूप आव्हानात्मक होतं. मी त्याला डिवचलं सुद्धा. मी त्याला माझ्या ओव्हरमध्ये सिक्स मारुन दाखवं असं सुद्धा सांगितलं. पण तो चिडला नाही. आपल्या सर्वांना माहितीय की, कोहली एक महान फलंदाज आहे. पण तो चांगला व्यक्ती सुद्धा आहे” असं अबरार अहमद म्हणाला. “मॅचनंतर विराटने माझ्या गोलंदाजीच कौतुक केलं, त्याने माझा दिवस चांगला गेला” असं अबरार अहमद म्हणाला. या सामन्यात विराट कोहली 111 चेंडूत नाबाद 100 धावांची मॅच विनिंग खेळी खेळला.