मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज रोहित शर्माने आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेहचा हात दिसत आहे. या दोघांच्या बोटांना मुलीने पकडलेले आहे. रोहितची पत्नी रितिकाने 30 डिसेंबरला मुलीला जन्म दिला. यामुळे वन डे टीम संघाचा उपकर्णधार रोहित ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतला.
पत्नी रितिकाने मुलीला जन्म दिल्यानंतर तातडीने रोहित मुंबईसाठी निघाला. बीसीसीआयनेही रोहितला शुभेच्छा दिल्या आहेत. रितिकासोबत रोहितने 13 डिसेंबर 2015 रोजी लग्न केले होते. आता त्यांनी आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्याने हॅलो वर्ल्ड, ‘सभी को शानदार 2019 की, मुबारकबाद’ असं फोटो शेअर करतान लिहिलं आहे. तर या फोटोला आता पर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळालेले आहेत.
रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यात भारतीय संघाने 137 धावांनी विजय मिळवला होता. चौथ्या कसोटी सामन्यात रोहित खेळणार नसून 8 जानेवारीला तो भारतीय संघात पुन्हा सहभागी होणार आहे. 12 जानेवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका सुरु होणार आहे.