
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघानं आतापर्यंत लैकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. एकही सामना न गमवता भारतानं थेट फायनलमध्ये धडक मारली. भारतानं साखळी सामन्यात बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव करून धडाक्यात उपांत्य फेरी गाठली, उपांत्य फेरीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता चॅम्पियन्स ट्रॉफिच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना हा न्यूझीलंड संघाशी होणार आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने साऊथ अफ्रिकेचा पराभव केला आहे. मात्र त्यापूर्वी झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला धूळ चारली होती. त्यामुळे या सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे.
मात्र आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं एकही सामना गमावला नाही, मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं एकदाही नाणेफेक जिंकलेली नाहीये. चारही सामन्यांमध्ये तो नाणेफेक जिंकू शकलेला नाहीये. मात्र आता फायनल सामन्यात रोहित शर्माला टॉस जिंकावाच लागेल कारण या मैदानावर नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे. जर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली तर मोठा उलटफेर देखील होण्याची शक्यता आहे.
गेल्या दहा सामन्यांचं रेकॉर्ड
रोहित शर्माचं नाणेफेक जिंकणं यासाठी आवश्यक आहे की, जर तुम्ही या मैदानावर झालेल्या दहा सामन्यांवर नजर टाकली तर तुम्हाला असं दिसून येईल की दहा पैकी सात सामने हे धांवाचा पाठलाग करणाऱ्या संघानं जिंकले आहेत. तर फक्त तीन सामने हे आधी फलंदाजी करणाऱ्या टीमनं जिंकले आहेत.टीम इंडियानं या मैदानावरील आपले तीन सामने हे धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत तर केवळ एक सामना जो न्यूझीलंडविरोधात खेळला गेला त्यामध्ये टीम इंडियानं आधी फलंदाजी केली होती.
पीच संथ, कोणाला फायदा?
ज्या मैदानात हा सामना होणार आहे, ते पीच अतिशय संथ आहे. सायंकाळच्या वेळी या पीचवर फलंदाजी करणं तुलनेनं अधिक सोपं जातं. त्यामुळे जो संघ नाणेफेक जिंकणार तो आधी गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. रोहित शर्मा आतापर्यंत सलग आकरावेळेला नाणेफेक हारला आहे, त्यामुळे यावेळी तरी जिंकणार का? हे पाहावं लागणार आहे.