मी पाकिस्तान संघाची आई नाही, शोएबच्या हुक्का पार्टीवर सानियाचे सडेतोड उत्तर

| Updated on: Jun 18, 2019 | 12:10 PM

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकच्या ट्विटला उत्तर देताना सानियाने आपण पाकिस्तान क्रिकेट संघाची आईही नाही आणि डाएटीशियनही नसल्याचे म्हणत वीना मलिकला फटकारले.

मी पाकिस्तान संघाची आई नाही, शोएबच्या हुक्का पार्टीवर सानियाचे सडेतोड उत्तर
Follow us on

मुंबई : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या हुक्का पार्टी वादावर सडेतोड उत्तर दिलं आहे. पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकच्या ट्विटला उत्तर देताना सानियाने आपण पाकिस्तान क्रिकेट संघाची आईही नाही आणि डाएटीशियनही नसल्याचे म्हणत वीना मलिकला फटकारले.

सध्या पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर पाकिस्तान संघाचा हुक्का पार्टीतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भारत-पाकिस्तान सामन्याच्या काही तास आधीचा असल्याचाही दावा करण्यात येत आहे. या व्हिडीओत शोएब मलिकसोबत सानिया मिर्झाही दिसत आहे. याचा आधार घेत वीना मलिकने सानियाला उद्देशून ट्विट केले होते, ”मला सानियाच्या मुलाची काळजी वाटते. तुम्ही त्याला हुक्का कॅफेमध्ये घेऊन गेलात. हे त्याच्यासाठी हानीकारक नाही का? माझ्या माहितीप्रमाणे ‘Archie’ हे जंक फुड खाण्याचे ठिकाण आहे. ते खेळाडूंसाठी किंवा लहान मुलांसाठी चांगले नाही. तु एक आई आणि खेळाडू दोन्ही आहेस, हे तुला चांगलंच माहिती आहे.”

विनाच्या ट्विटवर सानियानेही उत्तर देत ट्विट केले. सानिया म्हणाली, “मी माझ्या मुलाला हुक्का कॅफेत घेऊन गेले नव्हते. मी माझ्या मुलाची इतर कुणाहीपेक्षा अधिक काळजी घेते. ती काळजी करणे तुझं किंवा जगातील इतर कोणाचंही काम नाही. दुसरी गोष्ट, मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आई तर नाहीच, पण डाएटिशियन, मुख्याध्यापक किंवा शिक्षक देखील नाही.”

सानियाने व्हायरल झालेला व्हिडीओ विनापरवानगी शूट केल्याचे म्हटले आहे. तसेच टीकाकारांना फटकारत सामना हरल्यानंतर खेळाडूंना जेवण करण्याता अधिकार असतो, असो उपरोधिक टोलाही लगावला. व्हायरल झालेल्या 4 सेकंदाच्या व्हिडीओत शोएब मलिकसह काही पाकिस्तानी खेळाडू मित्रांसोबत हुक्का पिताना दिसत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहते चांगलेच संतापले आहेत.

सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी या व्हिडीओसोबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (PCB) टॅग करुन प्रश्न विचारले आहेत. यावर पीसीबीलाही उत्तर द्यावे लागले. पीसीबीने हा व्हिडीओ भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीचा नसून 2 दिवसांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच खेळाडू परवानगी घेऊन मित्र आणि कुटुंबियांसह जेवणाला बाहेर गेले होते असे नमूद केले.