
India-Pakistan Match 2025 : आज, 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया कप 2025 चा सामना होणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. या सामन्यामुळे भारतात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. क्रिकेटप्रेमींपासून ते विरोधकापर्यंत सर्वांनी सरकारला पहलगाम हल्ल्याची आठवण करून देत सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने आज या सामन्याविरोधात माझं कुंकू, माझा देश हे आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळेंच्या मुलीने प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाली त्यांची मुलगी?
संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी यांनी आज होणारा भारत आणि पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, ‘आजचा सामना आमच्या भावनांशी खेळ आहे. पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या संतोष जगदाळेंची मुलगी आसावरी जगदाळेंनी आज होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, या लोकांमध्ये भावना नाहीत, तिच लोक हे सगळं करतायेत. BCCIने नव्हतं करायला हवं. कारण अजून सहा महिनेसुद्धा झालेले नाहीत 22 एप्रिलला (पहलगाम हल्ल्याला) आणि तुम्ही पाकिस्तानसोबत ज्या देशाचे दहशतवादी येऊन आपल्या लोकांना येऊन मारून जातात, ज्या देशासोबत आपलं इतक्या वर्षांपासून वैर आहे, आपले कितीतरी जवान, सामान्य लोक इतक्या वर्षात दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. तरी सुद्धा तुम्ही त्या देशाच्या सामना खेळता.’
तुमच्या त्या वेळच्या भावना खोट्या
पुढे त्या म्हणाल्या, ‘आपल्या देशात यायचे नाही आणि आपण त्यांच्या देशात जायचे नाही म्हणून तुम्ही सामना दुबईला ठेवता. तुम्ही त्यांच्याशी कोणत्या मार्गाने डील करताय? अप्रत्यक्षपणे तुम्ही त्यांना फंड देताय दहशतवाद वाढवण्यासाठी. फक्त टीटी साइन करुन किंवा पाणी बंद करुन किंवा ट्रेड बंद करुन तुम्ही त्यांच्याशी संबंध तोडले असे नाही. जर तुम्हाला खरच त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे जे लोक शहीद झाले, त्यांच्या परिवारांबद्दल सहानुभूती असेल तर तुम्ही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे सामने खेळू नका. आजची ही मॅच होऊ नये अशी माझी इच्छा आहे. बोलत होते की आपल्या देशाने खूप चांगले काम केले आहे, आपल्या सैनिकांनी खूप चांगले काम केले त्या 26 लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले आहे तर मग हे काय आहे? जर तुम्ही आजची मॅच पाहिलीत तर तुम्हाला ज्या भावना त्यावेळेला होत्या त्या खोट्या होत्या. तुम्हाला काही फरक पडत नाहीये, कारण तुमच्या घरातलं कोणी गेलेले नाहीये किंवा तुमच्या जवळचे कोणी गेले नाहीये. कृपया हे करू नका. हे एक प्रकारे तुम्ही दहशतवादाला पाठिंबा देताय असाच त्याचा अर्थ होतोय.’