IND vs NZ : कॅप्टन श्रेयस अय्यरच्या मनाचा मोठेपणा, ट्रॉफी स्वीकारल्यानंतर मन जिंकणारी कृती, सगळीकडे चर्चा
IND vs NZ : शेवटच्या टी20 सामन्यात काल भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. पण पाच टी20 सामन्यांची सीरीज आधीच टीम इंडियाने जिंकली होती. मॅचनंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये घडलेली एक घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

भारतीय टीमने न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांची टी20 सीरीज 3-2 ने जिंकली. रविवारी हॅमिल्टनच्या सेडॉन पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या मालिका विजयाचं सेलिब्रेशन खास अंदाजात करण्यात आलं. पोस्ट मॅच प्रेजेंटेशनमध्ये भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने ट्रॉफी स्वीकारली. पण श्रेयसने ती ट्रॉफी युवा ऑलराऊंडर नमन धीरकडे सोपवली. त्यानंतर संपूर्ण टीमने ट्रॉफीसह फोटो काढला. श्रेयसच्या या कृतीची खूप चर्चा होतेय. 26 वर्षाचा प्लेयर नमन धीरने या सीरीजमध्ये मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपूर वापर करुन घेतला. मुंबई इंडियन्सच्या या ऑलराऊंडर प्लेयरला खालच्या फळीत फलंदाजीची संधी मिळाली. त्याने टीमच्या विजयात महत्वाचं योगदान दिलं. नमन धीर हा या टी20 सीरीजमध्ये भारतीय टीमसाठी दुसरा सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज आहे.
नमन धीरला गोलंदाजीची जास्त संधी मिळाली नाही. पण फलंदाजीतील त्याच्या प्रदर्शनाने टीम मॅनेजमेंटच लक्ष जरुर वेधून घेतलं. शिवम दुबे सारखा ऑलराऊंडर टीममध्ये असताना नमन धीरने आपली उपयुक्तता सिद्ध केली. ट्रॉफी जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने जे केलं, त्याच्या त्या कृतीने एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, शुबमन गिल यांची आठवण आली. या कॅप्टन्सनी अनेकदा किताब जिंकल्यानंतर युवा खेळाडूंना ट्रॉफीसह सेलिब्रेशनची संधी दिलेली. युवा खेळाडूंकडे ट्रॉफी सोपवण्याची परंपरा महेंद्र सिंह धोनीने सुरु केलेली. त्यानंतर अन्य भारतीय कर्णधारांनी ती पुढे नेली.
..तर सेलिब्रेशनचा उत्साह अजून वाढला असता
भारताने मालिकेत आधीच विजयी आघाडी घेतली होती. पण सीरीजमधील शेवटच्या दोन सामन्यात पराभव झाला. पाचव्या आणि अखेरच्या टी20 मध्ये भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 192 धावांचं टार्गेट दिलं होतं. न्यूझीलंडने तीन विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. शेवटचे दोन सामने जिंकले असते तर भारताच्या विजयी सेलिब्रेशनचा उत्साह अजून वाढला असता.