IND vs SA : टीम इंडियाच्या लज्जास्पद पराभवानंतर शुबमन गिलने सोडलं मौन, विचार करायला भाग पाडणारं बोलला

IND vs SA : नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेकडून लज्जास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाचे खांदे पाडणारा हा पराभव आहे. या मानहानीकारक पराभवासाठी हेड कोच गौतम गंभीर यांना जबाबदार धरण्यात येत आहे. आता संघाबाहेर असलेल्या शुबमन गिलने या पराभवावर मौन सोडलं आहे.

IND vs SA : टीम इंडियाच्या लज्जास्पद पराभवानंतर शुबमन गिलने सोडलं मौन, विचार करायला भाग पाडणारं बोलला
Shubman Gill
| Updated on: Nov 27, 2025 | 9:54 AM

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचा लज्जास्पद पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने भारताला 2-0 ने व्हाइटवॉश दिला. मूळात म्हणजे मायदेशात टीम इंडियाचा हा मानहानीकारक पराभव झाला. तमाम भारतीय क्रिकेट चाहते यामुळे दुखावलं गेले आहेत. हे स्वाभाविक सुद्धा आहे. कारण दक्षिण आफ्रिका भारतात येऊन सीरीज जिंकेल, त्यात ते इतका दणदणीत विजय मिळवतील अशी कोणी अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे टीम इंडियाच्या जगभरातील कोट्यावधी फॅन्सना हा बोचणारा पराभव आहे. भारताचा नियमित टेस्ट कॅप्टन शुबमन गिलने या पराभवानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. शुबमन गिल या सामन्यात खेळत नव्हता. पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गिलला दुसऱ्या कसोटीत खेळवण्याचा धोका पत्करला नाही.

दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर विजयासाठी 549 धावांचं विशाल टार्गेट ठेवलं होतं. काल शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 522 धावांची आवश्यकता होती. 8 विकेट शिल्लक होते. ही कसोटी जिंकणं तर अशक्य होतं. त्यामुळे निदान ड्रॉ करण्यासाठी खेळतील असं वाटलं होतं. पण स्टार खेळाडूंनी भरलेल्या टीम इंडियाचा डाव 140 धावांवर आटोपला. कोलकाता कसोटीचा हिरो सिमॉन हार्मरने दुसऱ्या कसोटी सामन्यातही टीम इंडियासाठी कर्दनकाळ ठरला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला भारतावर 408 धावांनी विक्रमी विजय मिळवता आला.

शुबमन गिलने पोस्टमध्ये काय म्हटलय?

25 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भारत भूमीवर दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळालं. वर्षभरात टीम इंडियाला मिळालेला हा दुसरा व्हाइटवॉश आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचे हेड कोच असतानाच, दोन कसोटी मालिकांमध्ये हे मानहानिकारक पराभव झाले आहेत. या पराभवामुळे टीम इंडियावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे, खासकरुन हेड कोच गौतम गंभीर यांना लक्ष्य करण्यात येतय. या पराभवातून बोध घेऊन टीमवर्क जास्त महत्वाचं आहे यावर शुबमन गिलने भर दिलाय.


कॅप्टन म्हणून त्याने सहकाऱ्यांचा उत्साह वाढवला

“शांत समुद्र तुम्हाला मार्ग दाखवू शकत नाही. वादळच तुम्हाला मजबूत बनवतं. आम्ही परस्परांवर विश्वास ठेऊ, एकमेकांसाठी लढू आणि पुढे जाऊ, अजून मजबूत होऊ” असं शुबमन गिलने आपल्या X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. भले संघाबाहेर असला, तरी कॅप्टन म्हणून त्याने सहकाऱ्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केलाय.