स्मृती मानधना – पलाश मुच्छलचं लग्न होणार की नाही? आईनेच केला खुलासा

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत विविध चर्चा होत आहेत. पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याचाही आरोप होत आहे. या सर्व चर्चांदरम्यान आता पलाशची आई अमिता मुच्छल यांनी लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

स्मृती मानधना - पलाश मुच्छलचं लग्न होणार की नाही? आईनेच केला खुलासा
स्मृती मानधना, पलाश मुच्छल
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 26, 2025 | 1:23 PM

जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार होते. सांगलीत लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांनाही सुरुवात झाली होती. परंतु विवाह विधीच्या अवघ्या काही तास आधी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. यानंतर स्मृती आणि पलाशने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अशातच पलाशचे कोरिओग्राफर मेरी डीकोस्टासोबतचे फ्लर्टिंगचे चॅट्स समोर आले होते. पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याच्या आरोपांदरम्यान या दोघांचं लग्न आता होणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर आता पलाशच्या आईने दिलं आहे.

‘हिदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पलाशची आई अमिता मुच्छल म्हणाल्या, “स्मृती आणि पलाश दोघांना खूप त्रास झाला आहे. पलाशचं स्वप्न होतं की त्याने धूमधडाक्यात त्याच्या नवरीला घरी आणावं. मीसुद्धा स्मृतीच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. सर्वकाही ठीक होईल. लवकरच दोघांचं लग्न होईल. पलाश आणि स्मृतीच्या वडिलांचं नातं खूप गहिरं आहे. आता दोघं हळूहळू ठीक होत आहेत.”

“स्मृतीच्या वडिलांशी पलाश खूप जोडलेला आहे. स्मृतीपेक्षाही ते दोघं एकमेकांच्या जवळचे आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांची प्रकृती बिघडली, तेव्हा स्मृतीच्या आधी पलाशनेच लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. जोपर्यंत ते पूर्णपणे बरे होत नाहीत, तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. स्मृती आणि पलाशच्या हळदीचा कार्यक्रम झाला होता, त्यामुळे आम्ही त्याला बाहेर जाऊ दिलं नव्हतं. रडून रडून त्याची तब्येत बिघडली होती. त्याला तिथेच चार तास रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. आयव्ही ड्रीप लावण्यात आली, ईसीजी आणि इतर चाचण्या झाल्या, त्यानंतर आता सर्व ठीक आहे. परंतु तो खूप तणावात आहे”, अशी माहिती पलाशच्या आईने दिली.

स्मृतीच्या वडिलांबद्दल त्यांनी पुढे सांगितलं, “ते खूप जास्त खुश होते. इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत होते. एक दिवस आधी ते खूप नाचले. परंतु जेव्हा आम्ही वरातीची प्लॅनिंग करत होतो, तेव्हा त्यांना त्रास होऊ लागला होता. आधी त्यांनी ती गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा त्रास वाढला, तेव्हा अखेर रुग्णवाहिका बोलवावी लागली.”