IPL 2026 Ishan Kishan : पंजाबची ढिसाळ फिल्डींग, अवघ्या 5 शब्दांत इशान किशनने उडवली खिल्ली

IPL 2026 Ishan Kishan : सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने पंजाब किंग्सविरुद्ध दमदार अर्धशतक झळकावले. मात्र, सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी त्याला जीवदानही मिळाले. या सामन्यानंतर, इशान किशनने सोशल मीडियावर एक इंस्टाग्राम पोस्ट टाकत पंजाब किंग्सच्या खराब क्षेत्ररक्षणाची खिल्ली उडवली.

IPL 2026 Ishan Kishan : पंजाबची ढिसाळ फिल्डींग, अवघ्या 5 शब्दांत इशान किशनने उडवली खिल्ली
इशान किशन
Image Credit source: Instagram
| Updated on: May 07, 2026 | 10:51 AM

आयपीएल 2026 मध्ये धमाकेदार सुरूवात करणाऱ्या पंजाब किंग्स संघाची लय आता बिघडली आहे. सलग सहा विजयांनंतर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबला आता सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा हा त्यांचा तिसरा पराभव होता. या सामन्यात सनरायझर्सच्या संघाने पंजाबला 33 धावांनी हरवलं. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्सने पंजाब किंग्ससमोर 236 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

त्यावेळी सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. मात्र त्यांच्या खेळीदरम्यान पंजाबची ढिसाळ फिल्डींग दिसून आली. पंजाबच्या खेळाडूंनी, क्षेत्ररक्षकांनी झेल सोडल्यामुळे सनरायझर्सनेच्या दोन्ही फलंदाजांना वारंवार जीवदान मिळाले. त्यामुळे या सामन्यानंतर, सनरायजर्सच्या इशान किशनने पंजाब किंग्सच्या खराब क्षेत्ररक्षणावर टीका केली. त्याने एक पोस्ट लिहून त्यांची खिल्ली उडवली. कालच्या सामन्यात पंजाबच्या क्षेत्ररक्षकांनी इशानला तीन वेळा जीवनदान दिलं. त्याचे 2 कॅच सोडले आणि एक स्टंपिंगही चुकवलं. एवढंच नव्हे तर केवळ इशानच नाही, तर हेनरिक क्लासेनचाही एक झेल पंजाबच्या खेळाडूंकडून सुटला होता.

इशान-क्लासेनचे अर्धशतक

पंजाबची ढिसाळ फील्डिंग, त्यांनी दिलेल्या जीवनदानाचा फायदा घेत, इशान आणि क्लासेन या दोघांनीही सनरायझर्ससाठी अर्धशतके झळकावली. आपलं अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वी, इशान किशनला सामन्यात पहिल्यांदा जीवदान मिळाले, जेव्हा तो 9 धावांवर असताना कूपर कॉनॉलीने त्याचा झेल सोडला. त्यानंतर तो 18 धावांवर असताना लॉकी फर्ग्युसनने त्याला बाद करण्याची आणखी एक संधी गमावली आणि 20 धावांवर असताना प्रभसिमरन सिंगने यष्टीचीत करण्याची संधी हुकवली. या डावखुऱ्या फलंदाजाने अखेरीस 32 चेंडूंमध्ये 55 धावा केल्या.

 


या मॅचमध्ये तीनवेळा जीवनदान मिळाल्यानंतर इशान किशनने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली, “Catch me if you can.” असं त्यात लिहीण्यात आलं होतं. काल ईशान किशन व्यतिरिक्त, क्लासेनलाही जीवनदान मिळालं होतं. तो 13 धावांवर असताना शशांक सिंगने क्लासेनचा एक सोपा झेल सोडला. शशांक सिंग हा गेल्या काही सामन्यांपासून त्याच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत आहे. त्याने या सीझनमध्ये एकूण पाच झेल सोडले आहेत. शशांक सिंगने जीवदान दिल्यानंतर क्लासेनने 43 चेंडूंमध्ये 69 धावा फटकावल्या.

Follow Us