IND vs SL : Justice For Kashmir लिहून मैदानावर विमानाच्या घिरट्या

| Updated on: Jul 06, 2019 | 5:15 PM

विश्वचषकात हा प्रकार होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातही असाच प्रकार घडला होता, ज्याची स्थानिक यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली.

IND vs SL : Justice For Kashmir लिहून मैदानावर विमानाच्या घिरट्या
Follow us on

लंडन : भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान हेडिंग्लेच्या मैदानावर जस्टिस फॉर काश्मीर लिहिलेल्या विमानाने घिरट्या घेतल्या. हे विमान मैदानावरुन जाताना त्यावर जस्टिस फॉर काश्मीर असं लिहिलेलं बॅनर लावण्यात आलं होतं. विश्वचषकात हा प्रकार होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातही असाच प्रकार घडला होता, ज्याची स्थानिक यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली.

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात जस्टिस फॉर बलुचिस्तान असं लिहिलेल्या विमानाने मैदानावर घिरट्या घेतल्या होत्या. यावेळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये राडाही झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद सोडवला आणि प्रकरणाची चौकशी करण्यात आली.

या घटनेची आयसीसीनेही गांभीर्याने दखल घेतली आहे. सामन्यादरम्यान दाखवण्यात आलेल्या या राजकीय संदेशांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असं आयसीसीने म्हटलंय.

सामन्यादरम्यान दाखवलेल्या कोणत्याही राजकीय संदेशाचा आयसीसीकडून निषेध करण्यात येत आहे. संपूर्ण विश्वचषकात हे प्रकार रोखण्यासाठी आम्ही स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने काम केलं आहे. यापूर्वीच्या सामन्यानंतर पश्चिम यॉर्कशायर पोलिसांनी आश्वासन दिलं होतं की अशी घटना पुन्हा होणार नाही. त्यामुळे पुन्हा हा प्रकार घडल्याचं दुःख आहे, असं आयसीसीने म्हटलंय.