स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्ससाठी ‘संकटमोचक’ बनून येणार!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : गतविजेता संघ चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीने शनिवारी म्हणजे 23 मार्च रोजी आयपीआलची सुरुवात होणार आहे. यावेळी राजस्थान रॉयल्सचं पारडं जड मानलं जातंय. त्याला कारणही तसंच आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा निलंबनाची शिक्षा पूर्ण करुन पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालाय. 2018 च्या आयपीएल मोसमात राजस्थानचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे होतं. […]

स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्ससाठी संकटमोचक बनून येणार!
Follow us on

मुंबई : गतविजेता संघ चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीने शनिवारी म्हणजे 23 मार्च रोजी आयपीआलची सुरुवात होणार आहे. यावेळी राजस्थान रॉयल्सचं पारडं जड मानलं जातंय. त्याला कारणही तसंच आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा निलंबनाची शिक्षा पूर्ण करुन पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालाय. 2018 च्या आयपीएल मोसमात राजस्थानचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे होतं. पण राजस्थानला खास कामगिरी करता आली नाही. आता राजस्थान पुन्हा एकदा जुन्या शिलेदारासह सज्ज आहे.

फलंदाजी आणि गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार राजस्थान रॉयल्सला बळ देणार आहे. त्याच्या येण्यामुळे फलंदाजीमध्ये बळ येईल. राहुल त्रिपाठी, जोस बटलर, एश्टन टर्नर यांच्याशिवाय अजिंक्य रहाणे हे राजस्थानचे प्रमुख फलंदाज आहेत. बटलरने गेल्या मोसमात अक्षरशः धुमाकूळ घालत सलग पाच अर्धशतक ठोकले होते. शिवाय ऑस्ट्रेलियाचा एश्टन टर्नरही यावेळी राजस्थानसाठी निर्णायक ठरु शकतो. त्याने नुकतंच भारताविरुद्ध वादळी खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. याशिवाय गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये दमदार फॉर्मात असलेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांचाही सहभाग आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोलंदाज जयदेव उनाडकट जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने रणजीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. शिवाय गेल्या मोसमात त्याने 11 विकेट घेतल्या होत्या. राजस्थानसाठी जोफ्रा आर्चर (15 विकेट) हा सर्वात यशस्वी ठरला होता. याशिवाय ईश सोधी, धवल कुलकर्णी, ओशाने थॉमस यांसारख्या गोलंदाजांचा राजस्थानच्या ताफ्यात समावेश आहे.

स्मिथचं पुनरागमन निर्णायक ठरणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षाच्या निलंबनानंतर स्टीव्ह स्मिथ आयपीएलमधून मैदानात पुनरागमन करणार आहे. त्याच्या येण्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणेला धोरणात्मक मदत तर होईलच, शिवाय फलंदाजीमध्येही विश्वासू खेळाडू म्हणून तो जागा घेईल. फलंदाजी आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये स्मिथच्या सहभागानेच राजस्थानचा यशाचा मार्ग सुकर होईल.

गेल्या आयपीएल मोसमात खराब सुरुवातीनंतरही राजस्थानने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. हे फक्त आणि फक्त जोस बटलरमुळे शक्य झालं होतं. अजिंक्य रहाणेही फॉर्मात नव्हता. त्याने 15 सामन्यात एका अर्धशतकासह फक्त 370 धावा केल्या होत्या. मोठा काळानंतर स्मिथचं पुनरागमन होतंय. त्यामुळे त्याचा फॉर्म कसा असेल याबाबत शंका आहे. गेल्या मोसमात राजस्थानने खेळलेल्या 15 सामन्यात 7 विजय आणि 8 पराभव स्वीकारावे लागले होते.

राजस्थान रॉयल्सचे खेळाडू

अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टीव स्मिथ, बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, ईश सोधी, के. गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमन बिर्ला, एस मिथुन, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण अरोन, ओशाने थॉमस, एश्टन टर्नर, लियाम लिविंगस्टोन, शशांक सिंह, रियान पराग, मनन वोहरा, शुभम रंजाने