IND vs PAK : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, कॅप्टन सलमान आगाने कोणावर फोडलं पराभवाचं खापर ?

T20 World Cup 2026 : कोलंबोमध्ये काल झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत टी20 विश्वचषकात पाकिस्तानचा हा भारताविरुद्ध सर्वात मोठा पराभव होता. त्यानंतर पाकिस्तानी कॅप्टनने या हाराकिरीचं खापर कोणावर फोडलं ?

IND vs PAK : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, कॅप्टन सलमान आगाने कोणावर फोडलं पराभवाचं खापर ?
भारताने पाकची उडवली धूळधाण
Image Credit source: Getty Images
| Updated on: Feb 16, 2026 | 8:48 AM

IND vs PAK, T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजमधील भारत वि पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना काल श्रीलंकेच्या कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या दोन्ही संघांचा सामना पाहण्यास दोन्ही देशातले चाहते नेहमीच उत्सुक असतात. कालच्या सामन्यात भारताने पाकला सहज लोळवलं. पाकचा 61 धावांनी पराभव करत धुव्वा उडवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना मजबूत धावसंख्या उभारली, मात्र 175 धावांच्या टार्गेटचा सामना करताना पाकिस्तानचे खेळाडू एकामागोमाग एक धारातीर्थी पडले आणि त्यांचा डाव 114 धावांवरच आटोपला. त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.  दरम्यान पराभूतच झालेल्या पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान आगा याने एक मोठं विधान केलं आणि सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत तो स्पष्टच बोलला. संघाच्या कमकुवतपणावरही त्याने प्रकाश टाकला.

पराभवानंतर काय म्हणाल कर्णधार ?

टीम इंडियाविरुद्धच्या 61 धावांनी झालेल्या मोठ्या पराभवानंतर सलमान आगाने संघाच्या कामगिरीबाबत सडेतोड मत व्यक्त केलं. “आमचे स्पिन्रसआज ऑफ होते. काही ठिकाणी कामगिरीचा अभाव होता. आमचा संघातील स्पिनर्सवर विश्वास आहे , कारण गेल्या 6 महिन्यांत त्यांनी शानदार प्रदर्शन केलं आहे ” असं तो म्हणाला. त्यानंतर तो फलंदाजीबद्दलही बोलला, “पॉवरप्लेमध्ये आम्ही खूप विकेट गमावल्या, जो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.” असं त्याने सांगितलं.

पिचबद्दल पाक कर्णधार बोलला. “पहिल्या डावात खेळपट्टी थोडी टॅकी होती आणि चेंडूने चांगली पकड घेतली. गोलंदाजीतही कामगिरीचा अभाव होता. पण दुसऱ्या डावात खेळपट्टीने पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी केली.” त्याने हे देखील कबूल केले की अशा मोठ्या सामन्यांमध्ये भावना नेहमीच जास्त असतात, परंतु संघाला त्याचा सामना कसा करायचा हे माहित आहे असं तो म्हणाला. “आम्ही असे अनेक सामने खेळलो आहोत. आता, पुढचा सामना दोन दिवसांत आहे, त्यामुळे आम्हाला त्याकडे लक्ष द्यावे लागेल. सुपर 8मध्ये पात्र होण्यासाठी तो सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर, स्पर्धा नव्याने सुरू होईल.” असंही पाक कर्णधाराने नमूद केलं.

भारताचा एकतर्फी विजय

काल झालेल्या सामन्यात पराकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारताने 20 ओव्हर्समध्ये 175 धावांची शानदार खेळी करत मोठं टार्गेट ठेवलं. प्रत्युत्तरात, पाकिस्तानच्या संघाचा डाव 18 षटकांत 114 धावांवरच आटोपला. भारताने पाकवर तब्बल 61 धावांनी विजय मिळवला आणि सुपर 8 मध्ये आपले स्थान निश्चित केले. पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये चार विकेट पडल्या, ज्यामुळे धावसंख्या फक्त 38 झाली. उस्मान खानने सर्वाधिक 44 धावा केल्या, परंतु इतर कोणीही मोठी धावसंख्या जोडू शकले नाही. पाकचा दणकून पराभव झाला.