
टीम इंडियाच्या T20 संघाची घोषणा होते, तेव्हा नेहमी एका खेळाडूच्या निवडीची चर्चा होते, ते म्हणजे संजू सॅमसन. हे मागच्या दोन-तीन वर्षांपासून सुरु आहे. संजू सॅमसनची भारताच्या टी 20 संघात निवड होते. पण प्लेइंग इलेव्हनमधल्या त्याच्या समावेशावरुन वादविवाद होतात. काहींच म्हणणं असतं की, संजूवर अन्याय होतोय, तर दुसऱ्याबाजूला संजूच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. त्यामुळेच टीम मॅनेजमेंटने बऱ्याचदा त्याच्यावर 100 टक्के विश्वास दाखवलेला नाही. म्हणूनच त्याचं संघात आत-बाहेर सुरु असतं. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा आठवड्याभरावर आलीय. अशावेळी संजू सॅमसनच्या फॉर्मने टीम मॅनेजमेंटची चिंता वाढवली आहे. न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीजच्या पहिल्या चार सामन्यात संधी मिळूनही संजू सॅमसनला छाप उमटवता आलेली नाही.
संजूचा संघर्ष सुरुच आहे. आज न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या अखेरच्या सामन्यात त्याला संधी मिळाली तर ती शेवटची संधी ठरु शकते. कारण यानंतर थेट वर्ल्ड कप आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटला प्रयोग करण्याची फारशी संधी मिळणार नाही. विनिंग कॉम्बिनेशनलाच प्राधान्य दिलं जाईल. न्यूझीलंड विरूद्धच्या चार सामन्यात 10, 6, 0 आणि 24 असं संजूचं प्रदर्शन आहे. खरंतर आशिया कपच्या वेळी शुबमन गिलचा टीममध्ये समावेश केल्यानंतर संजूने त्याची ओपनिंग पोजिशन गमावली. तो प्लेइंग इलेव्हन बाहेर होता.
स्वत:ला सिद्ध करुन दाखवावच लागेल
पण शुबमन गिलला नंतरच्या मालिकांमध्ये प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे वनडे आणि टेस्टमधील भारताचा नियमित कर्णधार गिलला टी 20 वर्ल्ड कप टीममधून ड्रॉप करण्याचा कठोर निर्णय निवड समितीने घेतला. त्यानंतर पुन्हा संजूला ओपनिंग पोजिशन मिळाली. आता संजूला सातत्याने संधी मिळतेय. त्यामुळे त्याला स्वत:ला सिद्ध करुन दाखवावच लागेल. अन्यथा त्याची जागा घ्यायला इशान किशन तयारच आहे. तिलक वर्मा सुद्धा दुखापतीमधून सावरतोय. त्यामुळे टीम मॅनेजमेंटकडे इशानला मधल्याफळीत ठेवण्याऐवजी ओपनिंगला पाठवण्याचा पर्याय आहे.
..तेव्हा इशानला आणणं योग्य ठरेल
संजूच्या या कठीण काळात माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने त्याचं समर्थन केलय. “वरच्या फळीत टॉप ऑर्डरमध्ये संजूला सातत्याने संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी तो पात्र आहे. मध्यंतरी संजूला मधल्याफळीत खेळवलं, ते चांगलं नव्हतं. तो त्याच्यावर अन्याय झाला. फॉर्म परत मिळवण्यासाठी संजूला संधी दिली पाहिजे” यावर इरफान पठाणने जोर दिला. त्यावेळी तो हे सुद्धा म्हणाला की, “संजूचा संघर्ष असाचा सुरु राहिला तर टीम मॅनेजमेंटकडे असलेला इशान किशनला परत आणण्याचा पर्याय समजू शकतो”