
भारतीय क्रिकेट टीमला इंग्लंड दौऱ्यात सुरुवातीच्या 3 पैकी दोन कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडिया या सीरीजमध्ये सीनियर खेळाडूंशिवाय खेळत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या टीमचा आता भाग नाहीयत. अनेक युवा खेळाडूंना या सीरीजमध्ये आपलं कौशल्य दाखवायची संधी मिळाली. जसप्रीत बुमराह सुद्धा टीमचा सीनियर खेळाडू आहे. त्याच्या प्रदर्शनावर टीम इंडियाचा जय-पराजय अवलंबून असतो. पण बुमराह ज्या कसोटीत खेळला नाही, त्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. बुमराह आणि टीम इंडियाबद्दल हैराण करणारी एक बाब समोर आली आहे.
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात लीड्स टेस्टपासून झाली. या मॅचमध्ये जसप्रीत बुमराहने पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट काढले. इंग्लंडला अडचणीत आणलं. टीम इंडियाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मग, एजबेस्टनमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुनरागमन केलं. भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला. बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत या सामन्यासाठी आराम दिला होता.
त्या सामन्यात बुमराह नसताना इतिहास रचलेला
लॉर्ड्सच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहच पुनरागमन झालं. योगायोगाने बुमराहने पुन्हा 5 विकेट काढले. त्यावेळी सुद्धा टीम इंडिया हरली. हैराण करणारी बाब म्हणजे बुमराहच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची अनुभवहीन गोलंदाजी दमदार ठरली. इंग्लंडचा पराभव केला. 2021 साली ब्रिसबेन टेस्टमध्ये सुद्धा असच झालं होतं. बुमराहसह अनेक सीनियर खेळाडू टीमचा भाग नव्हते. पण भारताने तो सामना जिंकून इतिहास रचला होता.
बुमराह असताना आणि नसताना विजयात फरक काय?
भले हे अनेकांना बोलायला, वाचायला आणि ऐकायला विचित्र वाटेल. पण जे आकडे समोर आलेत त्यानुसार, बुमराहच्या उपस्थितीत भारताने जास्त सामने गमावलेत. 2018 साली जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू केला. तेव्हापासून तो आतापर्यंत 47 कसोटी सामने खेळलाय. यात 20 सामने भारताने जिंकलेत. 23 मध्ये पराभव झालाय. 4 टेस्ट ड्रॉ झाल्यात. अशा प्रकारे टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी 42.55 आहे. या दरम्यान बुमराहशिवाय टीम इंडिया 27 कसोटी सामने खेळली. त्यात 70.37 टक्के यशासह 19 कसोटी सामने जिंकलेत. फक्त पाच टेस्टमध्ये पराभव झालाय.
आकड्यांमागच सत्य काय?
वरवर हे आकडे पाहिले तर असं वाटेल की, बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय टीम यशस्वी ठरते आणि तो खेळतो तेव्हा हरते. पण आकड्यांमागच सत्य असं आहे की, बुमराह 47 पैकी 35 सामने आशिया खंडाबाहेर खेळला आहे. परदेशी खेळपट्टयांवर यश मिळवणं कधीच टीम इंडियासाठी सोप्प राहिलेलं नाही.
पर्थमध्ये बुमराहच विजयाचा स्टार
दुसऱ्याबाजूला त्याच्याशिवाय टीम इंडियाने जे सामने खेळले, त्यात जिंकले जरी असेल, तरी बहुतांश सामने भारतात झाले आहेत. देशांतर्गत घरच्या मैदानावर टीम इंडियाने आपल्या स्पिनर्सच्या बळावर बहुतांश सामने जिंकले आहेत. त्यामुळे बुमराह टीममध्ये असला किंवा नसला त्याने जास्त फरक पडत नाही. त्याशिवाय ही गोष्ट विसरुन चालणार नाही, मागच्यावर्षी पर्थच्या कसोटी विजयात बुमराहच टीम इंडियाच्या विजयाचा स्टार ठरला होता.