Video : सानिया मिर्झा ढसा ढसा रडली, आठवणींचा पट, अधुऱ्या इच्छा, कोट्यवधी चाहत्यांमध्ये हळहळ

| Updated on: Jan 27, 2023 | 10:04 AM

करिअरच्या अंतिम सामन्यात अधुरं स्वप्न राहिल्याने सानिया रनर अप ट्रॉफी घ्यायला पोहोचली तेव्हा ढसा ढसा रडली. तिच्यासोबत चाहत्यांनाही अश्रू अनावर झाले.

Video : सानिया मिर्झा ढसा ढसा रडली, आठवणींचा पट, अधुऱ्या इच्छा, कोट्यवधी चाहत्यांमध्ये हळहळ
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्लीः भारताची स्टार टेनिस पटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) शुक्रवारी तिच्या कारकीर्दीतली अखेरची ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धा खेळली.  ही स्पर्धा प्रोफेशनल करिअरमधील शेवटची स्पर्धा असेल, अशी घोषणा सानिया मिर्झाने आधीच केली होती. या अखेरच्या सामन्यावर (Last Match) विजयाची मोहोर उमटवण्याची तिची इच्छा होती. मात्र ती अधुरीच राहिली. सामना झाल्यानंतर रनर अप ट्रॉफी घेण्यासाठी गेली. त्यावेळी  करोडो चाहत्यांसमोर आपल्या भावना मांडताना सानिया मिर्झाला अश्रू अनावर झाले. माइकसमोरच हुंदके देत रडली. तिच्या भावना ऐकणारे, व्हिडिओ करणारे श्रोते, खेळाडूही यावेळी भावूक झाले.

सानिया मिर्झाचा हा फक्त 56 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफ्फान व्हायरल होतोय. 19 वर्षांच्या कारकीर्दीत आपण काय कमावलं, काय गमावलं हे सांगण्याचा प्रयत्न तिने केला. तसेच ऑस्ट्रेलियन भूमीचेही तिने आभार मानले.

व्हिडिओत काय म्हणतेय सानिया मिर्झा?

रनर अप ट्रॉफी घेण्यासाठी पोहोचलेली सानिया मिर्झा माइकसमोर बोलतानाचा हा व्हिडिओ आहे. ती म्हणते, ‘ मी अजून काही स्पर्धा खेळू शकले असते. 2005 मध्ये माझ्या प्रोफेशनल करिअरला मेलबर्नमध्येच सुरुवात झाली. (सुरुवातीच्या स्पर्धांच्या आठवणीने सानिया मिर्झा भावूक होते. माइकसमोर बोलताना तिला अश्रू अनावर होतात. सॉरी गाइज.. म्हणत हाताने चेहरा झाकत ती हुंदके देऊन रडते… तिला प्रोत्साहित करण्यासाठी प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट होतो…) मी  18 वर्षांची असताना सेरेना विल्यम्ससोबत तिसऱ्या राउंडमध्ये खेळले होते.

18 वर्षांच्या या प्रवासात मी अनेकदा येथे आले, अनेक स्पर्धा खेळले. माझ्यासाठी हे क्षण खूप मौल्यवान आहेत. पण यावेळी ग्रँडस्लॅममध्ये विजयी होऊ शकले नाही… मला माझ्या घरी आल्यासारखी वागणूक दिल्याबद्दल आपली आभारी आहे..

चाहत्यांच्या लाखो शुभेच्छा

ऑस्ट्रेलियन ओपन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सानिया मिर्झाचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय. त्यावर जगभरातल्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्यात.

महत्त्वाच्या ग्रँड स्लॅममध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने झळकला, याचे श्रेय फक्त सानिया मिर्झाला जाते. या सुंदर आठवणींसाठी धन्यवाद, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे.

आमच्या देशातली ही सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू आहे. तिची मेहनत आणि जिद्दीमुळेच भारत ग्रँड स्लॅम जिंकू शकला. तिच्यामुळेच अनेक मुली टेनिसपटू होण्याचं स्वप्न उराशी बाळगून जिद्दीने खेळू लागल्यात, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे.

अखेरचा सामना, अधुरी स्वप्न…

सानिया मिर्झाने 19 वर्षांच्या करिअरमध्ये 6 वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली. दोन वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे. आता ही तिसरी स्पर्धा तिला जिंकायची होती. पण अखेरच्या फेरीत स्टेफनी आणि मातोसच्या जोडीने सानिया आणि बोपन्नाच्या जोडीला पराभूत केलं.

करिअरच्या अंतिम सामन्यात अधुरं स्वप्न राहिल्याने सानिया रनर अप ट्रॉफी घ्यायला पोहोचली तेव्हा ढसा ढसा रडली. तिच्यासोबत चाहत्यांनाही अश्रू अनावर झाले.