स्मृति मंधानासोबतचे लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छलचा मोठा निर्णय, आता थेट… नव्या ट्विस्टने भुवया उंचावल्या

गेल्या काही दिवसांपासून पलाश मुच्छल हा क्रिकेटर स्मृति मंधानासोबतचे लग्न मोडल्यामुळेचर्चेत आहे. अशातच आता त्याने मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर

स्मृति मंधानासोबतचे लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छलचा मोठा निर्णय, आता थेट... नव्या ट्विस्टने भुवया उंचावल्या
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 20, 2026 | 11:48 AM

Palash Muchhal : प्रसिद्ध क्रिकेटपटू स्मृती मंधानासोबतच्या ब्रेकअप आणि वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळानंतर संगीतकार आणि दिग्दर्शक पलाश मुच्छलने आता पूर्णपणे पुढे वाटचाल सुरू केली आहे. त्याने चित्रपटसृष्टीत एक नवी जबाबदारी स्वीकारत आपल्या पुढील चित्रपटाचे दिग्दर्शन हाती घेतले आहे. विशेष म्हणजे त्याच्या आगामी चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

ही माहिती सुप्रसिद्ध फिल्म क्रिटिक तरण आदर्श यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘श्रेयस तळपदे पलाश मुच्छलच्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित असून श्रेयस एका सर्वसामान्य माणसाची भूमिका साकारताना दिसणार आहे.’

या घोषणेनंतर पलाश आणि श्रेयस दोघांच्याही चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. श्रेयस तळपदे गेल्या काही वर्षांत आपल्या दमदार अभिनयामुळे विशेष चर्चेत आहे. त्याने ‘गोली मार के ले लो’, ‘कट्टी बट्टी’, ‘तारीख’, ‘पुणेरी मिसाल’, ‘इमरजेंसी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विनोद आणि गंभीर अभिनय दोन्ही प्रकारांमध्ये त्याची पकड मजबूत असून त्यामुळेच तो आज लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. पलाश मुच्छलसोबतचा हा नवा प्रोजेक्ट श्रेयसला वेगळ्या आणि अधिक वास्तववादी अंदाजात सादर करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पलाश मुच्छल हा केवळ गायक आणि संगीतकारच नाही तर आता तो यशस्वीपणे दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहे. त्याने ‘भूतनाथ रिटर्न्स’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी संगीत दिले असून अनेक गाजलेली गाणीही त्यानी संगीतबद्ध केली आहेत. दिग्दर्शक म्हणून त्यानी वेगळ्या कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईवर आधारित चित्रपट

पलाशच्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने रोजच्या जीवनातील संघर्ष, मानवी नातेसंबंध आणि सामाजिक प्रश्न यांचा प्रभावीपणे वेध घेतला जातो. त्याने 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अर्ध’ आणि 2024 मध्ये आलेल्या ‘काम चालू आहे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून या दोन्ही चित्रपटांना कथानक आणि मांडणीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला होता.

पलाश मुच्छलचा आगामी चित्रपट मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी, सततची धावपळ, संघर्ष आणि झगमगाट यासाठी ओळखली जाते. या चित्रपटात एका सामान्य माणसाच्या आयुष्याची कथा मांडली जाण्याची शक्यता आहे, जी मुंबईच्या गल्लीबोळांपासून लोकल ट्रेनपर्यंत आणि मोठ्या स्वप्नांपर्यंत पोहोचताना दिसेल.