
Jasprit Bumrah Bowling : टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह एक मॅच विनर आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या धावगतीला लगाम घालण्यात बुमराहचा रोल महत्वाचा मानला जातो. पण बुमराहची ही ओळख अजूनही कायम आहे का? हा प्रश्न आता क्रिकेट प्रेमींच्या मनात येऊ लागला आहे. त्याच्या गोलंदाजीची धार आधीपेक्षा कमी झालीय का? बुमराह सतत मार का खातोय? मागच्या दोन महिन्यात चार वेळा बुमराहची गोलंदाजी झोडून काढलीय. खासकरुन ते सुद्धा डेथ ओव्हर्समध्ये.त्याला डेथ ओव्हर्सच स्पेशलिस्ट मानलं जातं. बुमराहच्या गोलंदाजीला काय झालय? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याशिवाय मागच्या 12 महिन्यातील बुमराहच प्रदर्शन बरच काही बोलून जातं.
T20 इंटरनॅशनलमध्ये सध्या बुमराहची गोलंदाजी फोडून काढली जातेय, त्यामागचं कारण इंजरी असू शकतं. दुखापतीशी अजूनही त्यांची झुंज सुरु असण्याची शक्यता आहे. बुमराहने इंजरीनंतर जोरदार कमबॅक केलं. पण आधी ज्या फलंदाजांना बुमराहला खेळणं अवघड जात होतं, त्यांना आता बुमराहची गोलंदाजी समजू लागलीय. कदाचित हे सुद्धा त्याची गोलंदाजी फटकावण्यामागचं एक कारण असू शकतं.
त्याने या ओव्हरमध्ये 19 रन्स दिल्या
अलीकडे T20 इंटरनॅशनलमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी टीमने बऱ्याच धावा वसूल केल्या आहेत. मागच्या दोन महिन्यात चारवेळा बुमराहच्या गोलंदाजीवर एकाच ओव्हरमध्ये 15 किंवा त्यापेक्षा जास्त धावा लुटल्या आहेत. 28 जानेवारी 2026 म्हणजे काल वायजॅग येथे न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यात बुमराह बरोबर पुन्हा असच झालं. बुमराहला डेथ ओव्हर्सच स्पेशलिस्ट मानलं जातं. पण या मॅचमध्ये 19 वी ओव्हर टाकताना बुमराहची धुलाई झाली. त्याने या ओव्हरमध्ये 19 रन्स दिल्या.
बुमराहला धावा थांबवणं का जमत नाहीय?
न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यात एकाच ओव्हरमध्ये बुमराहने 19 धावा दिल्या. याच सीरीजच्या पहिल्या मॅचमध्ये 18 व्या ओव्हरमध्ये त्याने 15 धावा दिल्या होत्या. म्हणजे एकाच सीरीजमध्ये दोनवेळा त्याने 15 किंवा त्यापेक्षा जास्त धावा डेथ ओव्हर्समध्ये दिल्या. डिसेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीजमध्ये बुमराहने एकाच मॅचच्या दोन ओव्हर्समध्ये 15 किंवा त्यापेक्षा जास्त धावा दिलेल्या. 11 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यू चंदीगडच्या सामन्यात पावरप्लेच्या एका ओव्हरमध्ये त्याने 16 धावा दिल्या होत्या. त्याच सामन्यात शेवटची 20 वी ओव्हर टाकताना त्याने 17 धावा दिलेल्या. म्हणजे बुमराह पावरप्लेमध्ये धावा थांबवू शकत नाहीय किंवा डेथ ओव्हर्समध्ये.
मागच्या 12 महिन्यात बुमराहचं बेस्ट प्रदर्शन काय?
मागच्या 12 महिन्यात बुमराह 16 सामने खेळलाय. त्यात त्याने फक्त 18 विकेट घेतल्यात. यामध्ये त्याने एकदाही 5 विकेट किंवा 4 विकेट घेतलेल्या नाहीत. त्याचं बेस्ट प्रदर्शन 17 धावा देऊन 3 विकेट आहे. न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात हे प्रदर्शन पहायला मिळालं.