
स्मार्टफोन हा आज केवळ संवादाचं साधन न राहता आपल्या सगळ्या वैयक्तिक माहितीचा, फोटोचा, बँक डिटेल्सचा आणि महत्वाच्या कागदपत्रांचा खजिनाच बनलाय. पण कधी तरी फोनमध्ये बिघाड येतो आणि तो आपण जवळच्या रिपेअर सेंटरमध्ये दुरुस्तीला देतो. मात्र, फोन बाहेर देताना आपली प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते, याची जाणीव फार कमी लोकांना असते. भारतात अनेक युजर्स आपल्या मोबाईलमध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, बँक स्टेटमेंट्स, फोटो, विडिओ आणि इतर वैयक्तिक माहिती जपून ठेवतात. ही माहिती चुकीच्या हाती लागली, तर तिचा गैरवापर होण्याचा धोका वाढतो.
अशा वेळी, मोबाईल दुरुस्तीसाठी पाठवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आधीच करून ठेवणं खूप गरजेचं आहे. हे केल्याने तुमचा डेटा सुरक्षित राहील आणि तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही. चला तर पाहूया, त्या 6 अत्यावश्यक स्टेप्स कोणत्या आहेत…
1. डेटा बॅकअप घेणं विसरू नका
सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे, मोबाईलचं बॅकअप घ्या. Google Drive, iCloud किंवा इतर कुठल्याही क्लाउड प्लॅटफॉर्मवर सगळा डेटा सुरक्षित ठेवा. कारण दुरुस्ती दरम्यान फोनचं स्टोरेज किंवा डिस्प्ले बदलला जातो, तेव्हा सगळा डेटा गायब होण्याचा धोका असतो. बॅकअप केल्यास तुम्हाला पुन्हा तो डेटा सहज मिळवता येईल.
2. सर्व अकाउंट्समधून लॉगआउट करा
Gmail, WhatsApp, Facebook, Instagram, Google Pay, Paytm यांसारख्या अॅप्समधून लॉगआउट करणं आवश्यक आहे. तसेच, फोनमध्ये सेट केलेली फिंगरप्रिंट आणि फेस आयडी देखील डिअॅक्टिवेट करा. यामुळे कोणीही तुमचं अकाउंट एक्सेस करू शकणार नाही.
3. गेस्ट मोड ऑन करा
अँड्रॉइड युजर्ससाठी एक उत्तम पर्याय म्हणजे गेस्ट मोड. फोनमध्ये Settings > System > Multiple Users > Add Guest या पद्धतीने गेस्ट मोड ऑन करा. यामुळे टेक्निशियनला फक्त मर्यादित माहितीच दिसेल आणि तुमची खासगी माहिती सुरक्षित राहील.
4. SIM आणि मेमरी कार्ड बाहेर काढा
फोनमध्ये असलेल्या SIM आणि SD कार्डमध्ये तुमचे कॉन्टॅक्ट्स, मेसेज, फोटो आणि इतर माहिती असते. त्यामुळे फोन दुरुस्तीसाठी देण्याआधी हे दोन्ही कार्ड्स बाहेर काढणं गरजेचं आहे. अन्यथा, ही माहिती कुणाच्या हाती लागेल हे सांगता येत नाही.
5. डेटा एन्क्रिप्ट करा
सुरक्षेचा आणखी एक टप्पा म्हणजे फोन एन्क्रिप्ट करणे. हे करण्यासाठी Settings > Security > Encrypt phone या पर्यायावर जा. यामुळे तुमचा डेटा पासवर्डशिवाय कोणीही उघडू शकणार नाही.
6. फॅक्टरी रीसेट
जर तुमचा फोन पूर्णपणे दुरुस्त करायचा असेल, म्हणजे स्क्रीन किंवा बॅटरी बदलायची असेल, तर शेवटी फोनचा फॅक्टरी रीसेट करा. मात्र हे पाऊल उचलण्याआधी पूर्ण बॅकअप घ्यायलाच हवा. फॅक्टरी रीसेटने सगळा डेटा पूर्णपणे मिटवला जातो. त्यामुळे हे शेवटचं पाऊल नीट विचार करून घ्या.
तुमचा फोन एक स्मार्ट डिव्हाईस असला, तरी त्यात तुमचं आयुष्य साठलेलं असतं. त्यामुळे थोडं सावध राहणं, हीच खरी शहाणीव आहे. फोन दुरुस्तीसाठी देणं गरजेचं असेल, तरीही वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करा कारण प्रायव्हसी एकदाच गेली, तर पुन्हा मिळणार नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)