पेट्रोल-डिझेलमुळे आता मोबाईलचे रिचार्जही महागणार, कारण ऐकून कपाळावर हात माराल!

देशातील इंधन दरवाढीचा फटका आता टेलिकॉम क्षेत्राला बसत असून मोबाईल टॉवर्स आणि ५G नेटवर्कच्या वाढत्या खर्चामुळे रिचार्ज प्लॅन्स लवकरच महाग होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेलमुळे आता मोबाईलचे रिचार्जही महागणार, कारण ऐकून कपाळावर हात माराल!
Mobile Recharge
| Updated on: May 18, 2026 | 3:35 PM

सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत असताना आता या महागाईचा थेट फटका मोबाईल वापरकर्त्यांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. इंधन दरवाढीमुळे दूरसंचार कंपन्यांचा ऑपरेटिंग खर्च (Operating Cost) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता त्याचा भार लवकरच ग्राहकांच्या खिशावर पडण्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी, येत्या काही महिन्यांत मोबाईलचे कॉलिंग आणि डेटा प्लॅन्स महाग होऊ शकतात, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणि मोबाईल रिचार्ज यांचा थेट संबंध नसला तरी टेलिकॉम कंपन्यांच्या अंतर्गत गणितावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर १०७ रुपयांच्या पार गेले आहेत. या वाढलेल्या दरांमुळे मोबाईल नेटवर्क अविरत सुरू ठेवण्याचा खर्च वाढला आहे.

टॉवर्सचा 40 टक्के खर्च इंधनावर

देशभरात पसरलेले हजारो मोबाईल टॉवर्स २४ तास सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज आणि डिझेलचा वापर करावा लागतो. एका अहवालानुसार, कोणत्याही मोबाईल टॉवरच्या एकूण देखभाल खर्चापैकी तब्बल ४० टक्के खर्च हा केवळ इंधन आणि विजेवर होतो. ग्रामीण तसेच दुर्गम भागांमध्ये जिथे विजेचा तुटवडा आहे, तिथे हे टॉवर्स पूर्णपणे डिझेल जनरेटरवर चालवले जातात. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे कंपन्यांचा हा खर्च शेकडो कोटी रुपयांनी वाढला आहे.

5G नेटवर्क आणि हार्डवेअरचे नवीन संकट

दुसरीकडे, देशात सध्या 5G नेटवर्कचा विस्तार वेगाने सुरू आहे. मात्र, जुन्या 4G नेटवर्कच्या तुलनेत 5G टॉवर्सना चालवण्यासाठी प्रचंड प्रमाणात उच्च वीजपुरवठ्याची आवश्यकता भासत आहे. यामुळे कंपन्यांचा वीज वापराचा खर्च आधीच वाढला आहे. त्यातच जागतिक पुरवठा साखळीतील विस्कळीत होण्यामुळे नेटवर्क उपकरणे, बॅटऱ्या आणि इतर तांत्रिक हॉर्डवेअर याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

रिचार्ज कधी महागणार?

टेलिकॉम कंपन्या गेल्या काही काळापासून टॅरिफ प्लॅन्सचे दर वाढवण्याच्या तयारीत होत्या. परंतु, आता इंधनाच्या वाढत्या किमती आणि वाढता तांत्रिक खर्च पाहता कंपन्या लवकरच रिचार्जमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोबाईल ही आता प्रत्येक नागरिकाची प्राथमिक गरज बनली आहे. त्यामुळे ही दरवाढ सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला मोठा आर्थिक फटका देणारी ठरणार आहे.

Follow Us