टेन्शन देणारी बातमी ! भारतात Whatsapp बंद होणार?; केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर काय?

गेल्या काही दिवसांपासून देशात जी चर्चा सुरू होती. त्या चर्चेला बळ मिळणारं एक विधान समोर आलं आहे. भारतात व्हॉट्सअप बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरून तसे संकेत देण्यात आले होते. आज हा मुद्दा संसदेतही आला. त्यावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिलं आहे.

टेन्शन देणारी बातमी ! भारतात Whatsapp बंद होणार?; केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर काय?
| Updated on: Jul 29, 2024 | 4:45 PM

भारतात व्हॉट्सअप बंद होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ही चर्चा फक्त सामान्य माणसांपर्यंत राहिली नाही तर थेट संसदेपर्यंत गेली आहे. याबाबतचा एक सवाल केंद्र सरकारला विचारण्यात आला आहे. केंद्र सरकारने त्याला उत्तर दिलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भारतात व्हॉट्सअपची सर्व्हिस बंद करण्याबाबत मेटाने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे भारतात व्हॉट्सअप बंद होणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी केंद्र सरकारला व्हॉट्सअपबाबतचा सवाल केला होता. व्हॉट्सअप डिटेल्स शेअर करण्याबाबतच्या सरकारच्या आदेशाचं पालन करण्यास मेटाने नकार दिला आहे. त्यामुळे मेटा व्हॉट्सअप सर्व्हिस बंद करणार आहे का? असा सवाल काँग्रेस नेते तन्खा यांनी केंद्र सरकारला केला होता. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी हे उत्तर दिलं आहे.

वर्षभरापूर्वी काय घडलं?

यावर्षीच्या सुरुवातीलाच व्हॉट्सअपने दिल्ली कोर्टाला एक इशारा दिला होता. जर कंपनीला मेसेजच्या एन्क्रिप्शनला तोडण्यासाठी मजबूर केल्यास आम्ही भारतात काम करणं बंद करू, असा इशारा मेटाने दिला होता. त्यामुळे भारतातील व्हॉट्सअप यूजर्स टेन्शनमध्ये आले होते. मेटाने थेटपणे भारतातील नव्या आयटी नियमांना आव्हान दिलं होतं. हे नियम गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग करत असल्याचं मेटाने म्हटलं होतं.

वैष्णव काय म्हणाले?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संबंधित सरकारी निर्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्था कायम राखण्यासाठीच करण्यात आले आहेत. हे नियम भारताची संप्रुभता आणि सुरक्षेचं संरक्षण आणि इतर देशांशी मैत्री कायम ठेवण्यासाठीचे आहेत. सार्वजनिक व्यवस्था आणि गुन्ह्यांना बळ देणाऱ्या कोणत्याही घडामोडींना आवर घालण्यासाठी हे नियम आहेत, असं अश्विनी वैष्णव म्हणाले.

जुकरबर्गकडून भारताचं कौतुक

दरम्यान, मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी सर्वात आधी मेसेंजिग टेक्नॉलॉजीचा अवलंब केल्याबद्दल भारताचीं यापूर्वीच कौतुक केलं आहे. भारत या क्षेत्रातील ग्लोबल लीडर आहे. भारतात 400 मिलियन यूजर्ससह व्हॉट्सअपचा सर्वात मोठा बाजार आहे. त्यामुळेच दोन्ही एकमेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं जुकरबर्ग म्हणाले होते.