ChatGPT : चॅटजीपीटीचा सल्ला ऐकणं तरूणाला पडलं महागात, थेट हॉस्पिटलमध्येच

एआय टूल्स वैज्ञानिक माहिती अधिक सुलभ करू शकतात, परंतु ते कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये नेहमीच तज्ञांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

ChatGPT : चॅटजीपीटीचा सल्ला ऐकणं तरूणाला पडलं महागात, थेट हॉस्पिटलमध्येच
चॅटजीपीटीचा सल्ला ऐकणं पडलं महागात
| Updated on: Aug 12, 2025 | 12:37 PM

ChatGPT Diet Plan : सोशल मीडिया आणि वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे आजकाल लोकांकडून त्याचा वापर, त्यावर अवलंबून राहणं वाढलं आहे. चॅटजीपीटी आल्यापासून तर अनेकजण सर्रास त्याचा वापर करत असतात, मात्र त्यावर आंधळेपणे विश्वास ठेवून काहीही अवलंबणं हे जीवासाठी धोकादायक ठरू शकतं. याचं एक ज्वलंत, जितंजागतं उदाहरण समोर आलं असून चॅटजीपीटीचा सल्ला ऐकणं इसमाला इतक महागात पडलं की त्याची थेट हॉस्पिटलमध्येच रवानगी झाली.

खरं तर, ChatGPT ने सुचवलेल्या डाएट प्लॅनचे पालन केल्यानंतर एका तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांचे म्हणणे आहे की आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) शी संबंधित ब्रोमाइड विषबाधेची ही कदाचित पहिलीच घटना आहे. नेमकं काय झालं, ते जाणून घेऊया.

मीठ कमी करण्याबाबत चॅटजीपीटीकडे मागितला होता सल्ला

वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉक्टरांनी ‘ॲनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन: क्लिनिकल केसेस’ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, एका माणसाने त्याच्या आहारातून मीठ (सोडियम क्लोराईड) कमी करण्यासाठी चॅटजीपीटीचा सल्ला घेतला. त्यानंतर ChatGPT ने त्याला क्लोराईडऐवजी सोडियम ब्रोमाइड घेण्याचा सल्ला दिल्याचा आरोप आहे. त्या माणसाने तीन महिने हा सल्ला पाळला, पण त्याचदरम्यान त्याची प्रकृती बिघडू लागली. त्याला पॅरानोईया आणि मतिभ्रम यांसारखी गंभीर लक्षणे जाणवू लागली आणि अखेर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.

तपासणीनंतर डॉक्टरांनी ChatGPT ठरवलं दोषी

अखेर रुग्णालयात दाखल केल्यानंतर, जेव्हा त्याला रुग्णाला विचारण्यात आलं, तेव्हा त्याने सांगितले की त्याच्या आजाराचे कारण चॅटजीपीटी आहे. तेव्हा डॉक्टरांनी स्वतः ChatGPT ला तोच प्रश्न विचारला आणि AI ने पुन्हा ब्रोमाइड हा पर्याय सुचवला, परंतु ते मानवी वापरासाठी असुरक्षित आहे हे काही त्याने स्पष्ट केलं नाही. यावरून असे दिसून येते की एआय संदर्भ न समजता माहिती देऊ शकते, जे अत्यंत धोकादायक आहे, असं डॉक्टरांचे म्हणणं आहे. मात्र सुदैवाने, या प्रकरणात चांगली गोष्ट अशी की सुमारे तीन आठवड्यांच्या उपचारानंतर, ती व्यक्ती पूर्णपणे बरी झाली.

डॉक्टरांनी दिला इशारा

या घटनेनंतर, डॉक्टरांनी एक गंभीर इशारा दिला आहे. एआय टूल्स वैज्ञानिक माहिती अधिक सुलभ करू शकतात, परंतु ते कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये नेहमीच तज्ञांचा सल्ला घ्यावा, कारण एआय कधीकधी चुकीचे मार्गदर्शन देऊ शकते जे घातक ठरू शकते असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. एआयकडून मिळणारा सल्ला किती धोकादायक असू शकतो याचा अंदाज आपण या प्रकरणातून लावू शकतो.