मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार! अंबानींपासून मित्तलपर्यंत सर्वांचा काय आहे प्लॅन?

मोबाईलच्या सर्वच कंपन्यांनी मागील वर्षी आपले रिचार्ज प्लॅन महाग केले होते. आता पुन्हा कंपन्या रिचार्ज प्लॅन महाग करणार आहे. रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवण्यामागे अनेक कारणे आहेत. स्पेक्ट्रमची खरेदी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी खर्च वाढणार आहे. त्यामुळे प्लॅन महाग होणार आहे.

मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार! अंबानींपासून मित्तलपर्यंत सर्वांचा काय आहे प्लॅन?
मुकेश अंबानी, सुनील मित्तल
| Updated on: May 21, 2025 | 10:58 AM

देशात मोबाइल आता प्रत्येक घराघरात नाही तर प्रत्येकाच्या हातात आला आहे. मोबाइल गरजेची वस्तू झाली आहे. देशातील मोबाइल कंपन्यांनी मागील वर्षी रिचार्जचे दर वाढवले होते. जिओ, एअरटेल, व्हिआय या कंपन्यांनी दर वाढवले होते. आता येत्या काळात पुन्हा रिचार्ज प्लॅनचे दर वाढणार आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत 2025 पर्यंत मोबाइल रिचार्जचे दर वाढण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी आणि एअरटेलचे सुनील मित्तल यांच्या रिचार्ज दरवाढीच्या निर्णयानंतर मोबाइल युजर्सला जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. एका रिपोर्टनुसार, रिचार्जचे दर वाढवणे हा टेलिकॉम कंपन्यांच्या एक दीर्घकालीन योजनेचा भाग आहे. २०२७ पर्यंत टप्पा टप्प्याने दर वाढणार आहे. यामुळे कंपन्यांना जास्त कमाईची संधी मिळेल आणि ते आपले नेटवर्क आधीपासून चांगले तयार करु शकणार आहे.

का महाग होणार प्लॅन

कंपन्यांनी मागील वर्षी आपले रिचार्ज प्लॅन महाग केले होते. कंपन्यांनी जेव्हा 5G सर्व्हीस सुरु केली तेव्हा प्लॅनची किंमत वाढवली नव्हती. त्यामुळे आता कंपन्या आपले रिचार्ज प्लॅन महाग करत आहे. रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात 5G नेटवर्क अधिक चांगले करणे, देशातील सर्व भागांत पोहचवणे, तांत्रिक खर्च पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना जास्त गुंतवणूक करावी लागू नये. स्पेक्ट्रमची खरेदी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी खर्च वाढू शकतो.

देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांनी जुलै 2024 मध्ये रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले होते. त्यानंतर अनेक युजर बीएसएनएलकडे आले होते. कारण ग्राहकांना रिचार्जसाठी जास्त पैसे देऊन इंटरनेट आणि कॉलिंग पॅक घ्यावे लागत होते. त्यामुळे जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांचे काही ग्राहक कमी झाले. आता पुन्हा या कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा मोबाईल रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.