Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या हातात दिसला iPhone Air, नातवाला दिला फोन; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चा
Mukesh Ambani: देशातील सर्वांत श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्या हातात एक पांढरा स्मार्टफोन दिसत आहे.

Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. ते कोणत्या गाड्या वापरतात, त्यांची जीवनशैली कशी आहे, यापासून ते कोणता मोबाईल वापरतात, अशा अनेक गोष्टींची चर्चा होत असते. आता मुकेश अंबानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या हातात पांढऱ्या रंगाचा अतिशय पातळ स्मार्टफोन दिसत आहे. हा फोन अॅपलचा iPhone Air असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी हा फोन आपला नातू पृथ्वी अंबानी याला देताना दिसत आहेत.
व्हिडीओत नेमकं काय?
28 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअर बाजारातील लिस्टिंगशी संबंधित कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अंबानी कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये मुकेश अंबानी आपला नातू पृथ्वी अंबानी याच्यासोबत दिसत आहेत. यादरम्यान पृथ्वीला मोबाईल फोन हवा असल्याचं दिसताच मुकेश अंबानी खिशातून पांढऱ्या रंगाचा फोन काढून त्याला देतात. या फोनची अतिशय स्लिम डिझाइन आणि पांढरा रंग पाहून नेटकऱ्यांनी तो iPhone Air असल्याचा अंदाज लावला आहे. काहींनी तर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणता फोन वापरतात, यावरून मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
पहा व्हिडीओ-
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. काही नेटकऱ्यांच्या मते, मुकेश अंबानी यांच्या हातात दिसणारा फोन त्यांचा नसून मुलगा आकाश अंबानी याचा असू शकतो. आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान आकाश अंबानी यांच्या हातातही असाच पांढऱ्या रंगाचा आणि एकच रिअर कॅमेरा असलेला फोन दिसला होता. त्यामुळे दोन्ही फोन एकच असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
iPhone Air ची किंमत आणि फीचर्स काय?
अॅपलने 2025 मध्ये iPhone Air लाँच केला होता. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची केवळ 5.64 मिमी जाडी आणि 165 ग्रॅम वजन. यामध्ये 6.5 इंचांचा Super Retina XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये A19 Pro प्रोसेसर आणि 48 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. स्टोरेजसाठी 256GB, 512GB आणि 1TB असे पर्याय उपलब्ध आहेत. या फोनची सुरुवातीची किंमत 1,49,900 रुपये आहे.