
आजकाल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक जण फोनमध्ये सतत गुंतलेले असतात. सोशल मीडियाचे अतीवापरामुळे वेळ वाया जातो, ज्यामुळे काम, अभ्यास आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो. याशिवाय, फोनच्या अतिवापरामुळे मानसिक तणाव निर्माण होतात. परंतु काही सोप्या आणि प्रभावी उपाय वापरून आपण स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवू शकतो,
सोशल मीडियाच्या अॅप्सना अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आलं आहे की त्यांचं व्यसन सहज लागतं. वारंवार येणारी नोटिफिकेशन्स, नवनवीन कंटेंट आणि सततच्या अपडेट्समुळे मेंदू सतत त्या दिशेने ओढला जातो. यामुळे लक्ष विचलित होतं आणि काम, अभ्यास, झोप, अगदी नातेसंबंधही प्रभावित होतात. याशिवाय, सतत फोनमध्ये डोकं घालणं हे मानसिक तणाव, एकटेपणा आणि नैराश्यासारख्या समस्यांना जन्म देऊ शकतं.
या समस्येवर मात करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनमधील ‘डिजिटल वेलबीइंग’ किंवा ‘स्क्रीन टाइम’ फीचर वापरा. अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीमध्ये हे फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही कोणत्या अॅपवर किती वेळ घालवता याची माहिती मिळते आणि वेळेची मर्यादा सेट करता येते. फोकस मोड, ग्रेस्केल मोड आणि बेडटाइम मोडसारख्या पर्यायांचा वापर केल्यास विचलन टाळता येतं आणि झोपेचा वेळही सुधारतो.
तरीही अडचण होत असल्यास, ‘फॉरेस्ट’, ‘जोमो’ आणि ‘ओपल’ यांसारखी अॅप्स वापरून बघा. हे अॅप्स तुम्हाला सतत सोशल मीडिया अॅप्स उघडण्यापासून अडवतात. ‘फॉरेस्ट’ अॅप वापरत असताना जर तुम्ही फोनपासून दूर राहिलात, तर एक झाड वाढतं – एक प्रकारची मानसिक प्रेरणा! याव्यतिरिक्त, वेळ वाया घालवणारी अॅप्स डिलीट करणं, त्यांचे शॉर्टकट्स हटवणं किंवा होम स्क्रीनवरून लपवणं हा देखील एक प्रभावी मार्ग आहे.
शेवटी, जर हे सगळं करूनही तुमचं व्यसन थांबत नसेल, तर समुपदेशक किंवा थेरपिस्टची मदत घ्या. मानसिक आरोग्य तज्ज्ञ या समस्येकडे योग्य पद्धतीने पाहतील आणि योग्य उपाय सुचवतील. घरातील लोकांशी संवाद वाढवा, मैत्रिणींशी प्रत्यक्ष भेटा, छंद जोपासा – यामुळे फोनकडे लक्ष जाणं हळूहळू कमी होईल. आणि लक्षात ठेवा – स्क्रीनशिवायही आयुष्य सुंदर असतं!