Diwali Decoration : या दिवाळीत घरी आणा पाण्यावर पेटणारे दिवे! फक्त थोडंसं पाणी आणि होईल रोषणाई
पाण्यावर पेटणारे दिवे ही संकल्पना आपल्याला किती भारी वाटते ना. तेल, तूप, दरवर्षी दिवाळीत महाग होत असतात.काही ठिकाणी त्याचा तुटवडाही जाणवतो. जिथे मातीचे दिवे लावणं धोक्याचं वाटतं. अशा ठिकाणी पाण्यावर चालणारे दिवे एकदम फायद्याचे. वाचा

दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई, फराळ आणि अर्थातच दिव्यांची रोषणाई! पण यंदाच्या दिवाळीत बाजारात असे काही दिवे आले आहेत. जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण हे दिवे पेटवण्यासाठी ना तेल लागतं. ना तूप आणि ना कापसाची वात! फक्त थोडंसं पाणी टाकलं की हे दिवे आपोआप उजळतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत पारंपारिक पणत्यांसोबतच या दिव्यांचीही चर्चा रंगली आहे.
हे दिवे दिसायला साध्या पणतीसारखे असले तरी त्यामध्ये LED तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. दिव्याच्या आत एक छोटी बॅटरी, LED बल्ब आणि दोन धातूचे पिन आहे.दिवा कोरडा असताना सर्किट पूर्ण बंद असल्याने तो बंद राहतो. अशा दिव्यात थोडंसं पाणी टाकलं की पाण्यातील विरघळलेली खनिजे आणि आयन्समुळे त्या दोन पिनमध्ये विद्युत प्रवाहासाठी मार्ग तयार होतो. त्यामुळे सर्किट पूर्ण होतं आणि बॅटरीच्या मदतीने तो दिवा पेटतो.
तेल, वात आणि काडीपेटीची गरज नाही
या दिव्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पेटवण्यासाठी वेगळं तेल किंवा तूप टाकण्याची गरज नसते.कापसाची वात लावण्याचीहील आवश्यकता नाही. दिवा बंद करायचा असेल तर त्यातील पाणी काढून टाकलं कि सर्किट तुटतं आणि प्रकाश बंद होतो.
मिळालेल्या माहितीनुसार पाण्यावर पेटणारे हे दिवे प्रत्येकी 25 रूपये, तर डझनभर दिवे 240 रूपयांना उपलब्ध आहेत. हे दिवे प्लास्टिकचे बनवलेले असल्यामुळे मातीच्या पणत्यांप्रमाणे सहज फुटण्याची शक्यता नाही. त्यांचा पुन्हा वापर करता येतो. तेल, तूप आणि कापसाची बचत होत असल्यामुळे हे दिवे अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.
या दिव्यांचे फायदे :
सुरक्षित आणि प्रदुषणमुक्त : तेल – तूप नसल्यामुळे दिवा सांडल्यामुळे घरात कुठेही डाग पडत नाहीत. तसेच, लहान मुले किंवा पाळीव प्राणी असल्यास आगीचा कोणताही धोका नसतो.
हवेमुळे विझणारचं नाही : हे दिवे तुम्ही खिडकीत, बाल्कनित किंवा घराबाहेर कुठेही ठेवू शकता. कितीही जोराचा वारा आला तरी ते विझत नाहीत.
दीर्घकाळ टिकणारे : या दिव्यांमध्ये छोट्या बॅटऱ्या असतात. एकदा पाणी टाकल्यावर हे दिवे सलग 50 – 60 तास सहज जळू शकतात. बॅटरी संपल्यावर ती बदलताही येते.
हे दिवे खूप महाग नसल्यामुळे दरवर्षी स्वच्छ करून तुम्ही पु्न्हा वापरू शकता. हे दिवे पाण्यावर चालणारे एलईडी दिवे आहेत. पारंपरिक तेलाच्या पणतीप्रमाणे त्यांना खरी ज्योत नसते.त्यामुळे दिवाळीच्या सजावटीसाठी हा एक वेगळा पर्याय नक्कीच ठरू शकतो.