
आजकाल मॉल किंवा मोठ्या ब्रँड शोरूममध्ये जाणं अगदी सामान्य झालंय. कोणी खरेदीसाठी जातं, तर कोणी फक्त फिरायला. पण कधी लक्ष दिलंय का की या सगळ्या ठिकाणी एक हलकं, छान म्युझिक सतत वाजत असतं? आपल्याला वाटतं की वातावरण मस्त ठेवण्यासाठी असतं, पण खरं सांगायचं झालं तर यामागे एक स्मार्ट मानसशास्त्र असतं जे तुमच्यावर आणि तुमच्या खरेदीच्या सवयींवर सरळ परिणाम करतं.
मॉलमध्ये फिरताना असं म्युझिक कानावर आलं की माणूस रिलॅक्स होतो, मन शांत होतं, आणि तो त्या ठिकाणी थोडा जास्त वेळ थांबतो. आणि हेच तर त्या ब्रँड्सना हवं असतं. कारण तुम्ही जितका वेळ दुकानात थांबता, तितक्या वस्तू पाहता, विचार करता, आणि बऱ्याच वेळा काहीतरी विकतही घेता. म्हणजेच म्युझिक म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नाही ही खरी तर एक खरेदी वाढवणारी ट्रिक असते!
आज मॉल हे फक्त खरेदीसाठी उरलेलं नाही, तर तिथं खाण्यापिण्यापासून थेट एंटरटेनमेंटपर्यंत सगळं मिळतं. अशा ठिकाणी म्युझिक वातावरणात फ्रेशनेस आणतं, आणि ग्राहकही मस्त मूडमध्ये राहतो.
काही शोरूम्समध्ये तरुणांना भुरळ घालण्यासाठी ट्रेंडी गाणी लावली जातात. Gen Z म्हणजे नवीन पिढी त्या गाण्यांमुळे त्या ब्रँडशी जास्त रिलेट करते. काही ठिकाणी शांत, एलिगंट म्युझिक लावलं जातं ज्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही एखाद्या खास ठिकाणी खरेदी करता आहात. सॉफ्ट क्लासिकल किंवा लो बीट म्युझिकमुळे ब्रँडचा दर्जाही जास्त वाटतो.
हे म्युझिक फक्त ग्राहकांसाठी नाही, तिथले कर्मचारीही त्याचा फायदा घेतात. सौम्य म्युझिकमुळे त्यांचा मूड चांगला राहतो, ते फ्रेश वाटतात आणि ग्राहकांशी जास्त चांगल्या पद्धतीनं वागतात. यामुळे ग्राहकही खुश होतात आणि खरेदी करायची शक्यता वाढते.
आणखी एक गोष्ट जर कुठं म्युझिक नसेल तर जागा अगदी कंटाळवाणी वाटते. माणूस पटकन बाहेर पडतो. पण म्युझिक असेल तर आपण तिथं थोडा वेळ जास्त थांबतो. कारण आपल्याला त्या ठिकाणी कंफर्टेबल वाटतं.
तर सांगायचं झालं, की मॉल किंवा ब्रँडेड शोरूममध्ये चालणारं ते सौम्य म्युझिक नुसतंच कानाला गोड वाटतं असं नाही ते तुमच्या मूडवर काम करतं, तुम्हाला रिलॅक्स करतं, तुम्ही जास्त वेळ तिथं थांबता आणि शेवटी खरेदी करायलाही तयार होता. हे खरंतर एक ‘साउंड बिझनेस’ असतं कानातलं संगीत तुमच्या खिशावर थेट परिणाम करतं, तेही तुम्हाला कळायच्या आधी.