Success Story : दिवसा शिक्षण, रात्री…वय 19, खांद्यावर 10 लाखांच्या कर्जाची जबाबदारी! अभिरामची कहाणी पाहून नेटकरीही भावूक
सकाळी कॉलेज आणि रात्री सिक्यूरिटी गार्डची नोकरी कुटुंबाच कर्ज फेडण्यासाठी 19 वर्षीचा अभिराम करतोय मेहनत. त्याच्या या मेहनतीची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. कितीही प्रसिद्धी मिळाली तरी त्याने शिक्षण न सोडण्याचा निर्णयावर ठाम आहे.

वय अवघं 19 वर्षे… या वयात अनेक मुलं कॉलेज, मित्र आणि आपल्या करिअरच्या स्वप्नांमध्ये रमलेली असतात. पण हैद्राबादमधील अभिराम याचं आयुष्य काहींस वेगळं आहे. सकाळी कॉलेजला जायचं आणि रात्री सिक्युरिटी गार्डची ड्यूटी करायची, असा त्याचा रोजचा दिनक्रम. त्याच्या कुटुंबाच्या डोक्यावर सध्या 10 लाखाचं कर्ज आहे. दर महिन्याला 27 हजारांचा हप्ता जातो. यासाठी अभिराम आपल्या वडिलांसोबत काम करून कुटुंबाला हातभार लावत आहे. त्याची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.
अभिराम हैद्राबादमधील के.जी रेड्डी कॉलेजमध्ये कॉम्युटर सायन्समधून बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याचे वडिलही सिक्यूरिटी गार्ड म्हणून काम करतात. विशेष म्हणजे दोघेही एकाच ठिकाणी नोकरी करतात. फक्त दोघांच्या ड्युटीच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. अभिराम रात्रीची शिफ्ट करतो. तर त्याचे वडील सकाळची ड्युटी सांभाळतात. सकाळी सातच्या सुमारास वडील कामावर पोहोचतात आणि अभिरामची ड्युटी तेव्हा संपते. त्यानंत तो कॉलेजची तयारी करतो.
अभिराम आपल्या आई वडिलांसह दोन बहिणींसोबत हैद्राबादमधील फिल्म नगर – जुबली हिल्स परिसरात भाड्याच्या घरात राहतो. दोन बहिणी आणि आई – बाबा असं पाच जणांचं कुटुंब, छोटी बहीण दहावीत शिकते, तर मोठी फिजिओथेरेपीच्या चौथ्या वर्षाला आहे. अभिरामच्या वडिलांना सिक्यूरिटी गार्डच्या नोकरीतून 16 हजार रूपये मिळतात. तर अभिरामला 13 हजार. घरभाडं, किराणा आणि इतर खर्च भागवण्यासाठी अभिरामची आई आसपासच्या घरांमध्ये घरकाम करते. अभिराम गेल्या 10 महिन्यांपासून सिक्यूरिटी गार्डची नोकरी करत आहे.
सिक्यूरिटी गार्ड नोकरीच्या आधी अभिराम पॅकेजिंगचे काम करत होता. पण त्यामुळे अभ्यास, असाइनमेंट पूर्ण करायला वेळ मिळत नव्हता. म्हणून ती नोकरी बदलून त्याने सिक्यूरिटी गार्डची नोकरी पकडली. यात त्याला रात्री शांतपणे अभ्यासाकडे लक्षही देता येते.
अभिराम केवळ नोकरी आणि शिक्षणापुरता मर्यादित नाही तर तो सोशल मीडियावर बीटेक सिक्यूरिटीवाला या नावाने अकाउंट चालवतो. आपले रोजचे अनुभव तो त्यावर शेअर करत असतो. त्याचे चांगले फॉलोवर्स जमले आहेत. अनेक विद्यार्थी त्याच्याशी संपर्क साधून शिक्षणासोबत नोकरी कशी सांभाळायची याबद्दल मार्गदर्शनही घेतात. अभिरामचं म्हणणं आहे की, कोणतंही प्रामणिक काम छोटं किंवा मोठं नसतं. समाज काय म्हणेल याचा विचार करून काम करण्याची लाज बाळगू नका. त्याला भविष्यात बीटेतचं शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवायची आहे. परिस्थितीमुळे महागडे अभ्यासक्रम पूर्ण न करू शकणाऱ्या मुलांना मदत करण्याचे देखील त्याचे स्वप्न आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली तरी शिक्षण सोडणयाचा कोणताही विचार नाही. त्याला पहिलं पेड ब्रँड कोलॅब जरी मिळालं असलं, तरी त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाही. असंही त्याने सांगितलं. सध्या अभिरामचं एकचं स्वप्न आहे, ते म्हणजे कुटुंबाला कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढणे, स्वत:चं शिक्षण पूर्ण करायचं आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर पुढे जायचं