
भारतात बदलती जीवनशैली आता लोकांच्या ‘ग्लास’पर्यंत पोहोचली आहे. पूर्वी दबक्या आवाजात होणारी दारूची चर्चा आता ड्रॉइंगरूम आणि सोशल गॅदरिंग्जचा महत्त्वाचा भाग बनली आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालाने आणि उद्योगातील दिग्गजांच्या वक्तव्याने हे सिद्ध केलंय की, भारतीय समाजात दारू पिण्याबाबतची जुनी परंपरा वेगाने मोडली जातेय. हा बदल फक्त सामाजिक नाही, तर आर्थिक क्षेत्रातही घडतोय.
महागड्या दारूचा बाजार वेगाने वाढतोय
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, फ्रेंच कंपनी ‘पर्नोड रिकार्ड इंडिया’चे सीईओ जीन टूबॉल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, भारतात लोकांची खरेदीशक्ती वाढली आहे आणि त्यासोबत त्यांच्या पसंतीतही ‘प्रीमियम’ बदल झालाय. आता तरुण सामान्य दारू सोडून महागडे आणि प्रीमियम ब्रँड्सला प्राधान्य देतायत.
पर्नोड रिकार्डसारख्या दिग्गज कंपन्यांसाठी भारत आता फक्त एक बाजार नाही, तर ‘ग्रोथ इंजिन’ बनलाय. मागील आर्थिक वर्षात कंपनीच्या जागतिक विक्रीत भारताचा वाटा 13 टक्के होता. विशेष म्हणजे, या बाबतीत भारताने चीनला मागे टाकलं आणि अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. जीन टूबॉल यांचं म्हणणं आहे की, दरवर्षी भारतात जवळपास 2 कोटी तरुण अशा वयात येतात जेव्हा ते कायदेशीररीत्या दारू पिऊ शकतात. हा प्रचंड ग्राहकवर्ग थेट बाजारात उतरतोय. भविष्यातील आर्थिक ट्रेंड्स सांगतायत की, दारूच्या खप आणि बाजाराच्या बाबतीत भारत लवकरच अमेरिकेलाही मागे टाकेल. म्हणूनच कंपनी आता स्वस्त दारूच्या सेगमेंटमधून बाहेर पडून पूर्ण लक्ष प्रीमियम आणि सुपर-प्रीमियम ड्रिंक्सवर केंद्रित करतेय. कारण भारतीय आता ‘क्वालिटी’साठी पाकीट सैल करण्यास तयार आहेत.
जगापेक्षा वेगळा भारताचा ट्रेंड
जगभरात तरुण आरोग्याबाबत जागरूक होऊन दारूपासून दूर जातायत. पण भारतात मात्र उलट गंगा वाहतेय. २०२४ ते २०२९ या कालावधीत भारतात दारूचा खप ३५७ दशलक्ष लिटरने वाढेल असा अंदाज आहे. जग ‘सोबर’ (नशामुक्त) होत असताना भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारा अल्कोहोल बाजार बनण्याच्या मार्गावर आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, २०२० मध्ये भारतात प्रति व्यक्ति दारूचा खप ३.१ लिटर होता, २०२३ मध्ये तो ३.२ लिटर झाला आणि २०२८ पर्यंत ३.४ लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डनुसार, आज भारतातील दारूचा बाजार ६० अब्ज अमेरिकन डॉलरचा झाला आहे, जो जागतिक व्यापाराच्या नकाशावर भारताला अत्यंत महत्त्वाचा बनवतो. भारताचे तरुण प्रीमियम दारूला प्रचंड पसंती देतायत आणि हे क्रेझ दिवसेंदिवस वाढतंच चाललाय!