
बेंगलुरूच्या वाढत्या महागाईशी संबंधित एका व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ माजली आहे. यूलिया अस्लमोवा (Iuliia Aslamova) नावाच्या एका रशियन महिलेने नुकतेच इंस्टाग्रामवर तिच्या महिन्याच्या खर्चाची यादी शेअर केली. ती पाहून सर्वजण चकीत झाले आहेत. गेल्या ११ वर्षांपासून भारताच्या या टेक हबमध्ये राहणाऱ्या या रशियन महिलेच्या खर्चाचा एकूण आकडा ऐकून प्रत्येकजण अवाक झाला आहे.
यूलियाच्या म्हणण्यानुसार, बेंगलुरूमध्ये तिच्या तीन सदस्यांच्या कुटुंबाचा मासिक खर्च सुमारे ३ लाख रुपये आहे. तिने सांगितले की, तिच्या घराचे भाडे १.२५ लाख रुपये आहे. याशिवाय, खाण्यापिण्याच्या आणि घरगुती वस्तूंवर ७५,००० रुपये खर्च होतात. शाळेच्या फीवर ३०,००० रुपये आणि आरोग्य व तंदुरुस्तीवरही ३०,००० रुपये खर्च होतात. याशिवाय, पेट्रोलसाठी ५,००० रुपये मासिक खर्च आहे.
वाचा: सानियाचं साराला सरप्राईज गिफ्ट, काय घडलं बर्थडेच्या दिवशी? अर्जुनही झाला आवाक!
घरात काम करणाऱ्या बाईच्या पगारावरून गोंधळ!
पण जेव्हा यूलियाने तिच्या व्हिडिओत सांगितले की, ती तिच्या घरात काम करणाऱ्या बाईला ४५,००० रुपये महिना पगार देते, तेव्हा लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून कमेंट्सचा पूर आला आहे. एकाने मिश्किलपणे विचारले, “तुम्ही ताज हॉटेलमध्ये राहता का?” दुसऱ्याने विचारले, “सव्वा लाख भाडे? मॅडम, ही चूक तर नाही ना?” एका अन्य युजरने लिहिले, “ही महिला माझा वार्षिक पगार एका महिन्यात उडवत आहे.” आणखी एकाने लिहिले, “कामवाल्या बाईला ४५ हजार? इतका पगार तर सुशिक्षित लोकांनाही मिळत नाही.”
महागाईवर रशियन महिलेची राय
या रशियन महिलेने तिच्या व्हिडीओत सांगितले की, ११ वर्षांपूर्वी ती जेव्हा बेंगलुरूत आली तेव्हा सर्व गोष्टी खूपच स्वस्त होत्या. त्यावेळी HSR लेआउटमध्ये २ BHK फ्लॅट २५,००० रुपयांच्या भाड्याने मिळायचा. पण आजच्या काळात तीन सदस्यांच्या कुटुंबाला सुखाने राहण्यासाठी किमान अडीच लाख रुपये लागतात. मात्र, अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांचे मत आहे की, यूलियाची जीवनशैली वेगळी आहे, त्यामुळे तिचा खर्चही जास्त आहे. पण कामवाली बाईला ४५ हजार रुपये पगार देण्याच्या गोष्टीने लोकांमध्ये नवीन वादाला तोंड फोडले आहे.