
गेल्या काही वर्षांपासून भारतासह जगभरात विविध ठिकाणी छुपे कॅमेरे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा महिला कपडे बदलत असलेल्या रुममध्ये, महिलांचे बाथरुम, हॉस्टेल, हॉटेल, शॉपिंग मॉलमध्ये अशाप्रकारे छुपे कॅमेरे लावलेले असतात. याद्वारे महिलांचे अश्लील फोटो किंवा व्हिडीओचे काढून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग केले जाते. काही वेळा हे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडिया वेबसाईटवरही टाकले जातात. आपण अनेकदा बाहेर फिरायला गेल्यानंतर हॉटेलच्या रुमचे सहज बुकींग करतो. प्रवासादरम्यान हॉटेल रुम बुकींग करणे ही फारच सामान्य बाब मानली जाते.
पण जगभरातील अनेक लोक आजही हॉटेल रुम बुक करण्यास घाबरतात. जेव्हा एकटी मुलगी किंवा जोडपे हे फिरण्यासाठी गेलेले असताना त्यांना रुम बूक करणे हे फारच धोकादायक वाटते. कारण अनेकदा हॉटेलच्या रुममध्ये छुपे कॅमेरा आढळतो. या कॅमेऱ्याद्वारे त्या व्यक्तींच्या आयुष्यातील खासगी क्षणांचे रेकॉर्डिंग केले जाते. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेलिंग करुन पैसे उकळले जातात. त्यातच आता एका एअर हॉस्टेसने प्रशस्त हॉटेलमधील रुममध्ये छुपा कॅमेरा लपवण्यात आला होता, याबद्दलची धक्कादायक गोष्ट उघड केली आहे. विशेष म्हणजे तिने याबद्दलचे अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
निक अलिसा असे या एअर हॉस्टेसचे नाव आहे. तिने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. निक अलिसा ही मलेशिअन एअरलाईन्समध्ये काम करते. ती कायमच विमानात प्रवाशांना येणाऱ्या समस्या आणि इतर माहिती देत असते. गेल्या अनेक वर्षांपासून ती एअर हॉस्टेसमधून काम करत आहे. नुकतंच निक अलिसासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
निक अलिसाने नुकतंच कोरियात गेली होती. कोरियातून दुसरं फ्लाईट दुसऱ्या दिवशी असल्याने तिने तिथेच जवळच्या हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. तिने एका प्रशस्त हॉटेलमध्ये बुकींग केले. तिने हॉटेलच्या रुममध्ये चेक इन केले. ती फ्रेश झाली आणि थोडावेळ आराम करण्यासाठी ती बेडवर पडली. यानंतर तिने एसी सुरु केला. तिच्या रुममधील सर्व दिवे बंद होते. त्याच वेळी तिची नजर एसीतून चमकणाऱ्या लाल लाईटकडे गेली.
तिच्या एसीत एक लाल रंगाची लाईट चालू बंद होत असल्याचे तिच्या लक्षात आले. निक अलिसाला काही तरी गोंधळ असल्याचे लक्षात आले. तिने गुपचूप हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. यानंतर अलिसाला एसीमध्ये छुपा कॅमेरा लपवण्यात आल्याचा संशय आला. त्यानंतर तिने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. काही वेळात पोलीस त्या हॉटेलमध्ये पोहोचले. पोलीस तिथे पोहोचताच त्यांनी एसीची तपासणी केली. या तपासणीत त्यांना एसीमध्ये एक छुपा कॅमेरा लावण्यात आल्याचे आढळले. हा सीसीटीव्ही होतो.
यानंतर अलिसाने तात्काळ हॉटेलच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. यानंतर हॉटेल मालकांनी हा प्रकार चुकून घडल्याचे कबुल केले. अलिसाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेनंतर तिने हॉटेल रुमचे बुकींग करताना काळजी घ्यावी, असा सल्लाही सर्वांना दिला आहे.
हॉटेल निवडताना सावधगिरी: होटलचे रिव्ह्यू वाचावेत. तसेच इतर ग्राहकांच्या अनुभवांची माहिती घेऊन हॉटेलची निवड करावी.
खोलीची बारकाईने तपासणी: खोलीतल्या प्रत्येक कोपऱ्याची बारकाईने तपासणी करा. एसी, स्विचबोर्ड, घड्याळे, चित्रांच्या फ्रेम इत्यादी ठिकाणी गुप्त कॅमेरे लपवले जाऊ शकतात.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधा: जर तुम्हाला काही संशय आला तर हॉटेल स्टाफशी संवाद साधा.
पोलिसांना कळवा: जर तुम्हाला खोलीत गुप्त कॅमेरा आढळला तर तात्काळ पोलिसांना कळवा.