
बिहारच्या पूर्णिया येथील कौटुंबिक सल्ला केंद्रात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या महिलेसोबत दोन व्यक्ती कौटुंबिक सल्ला केंद्रात आले. दोघेही तिचे पती होते. पण यातील एक होता मुस्लिम आणि दुसरा होता हिंदू. दोघांनीही हीच आपली बायको असल्याचा दावा केला आहे. यामुळे कौटुंबिक सल्ला केंद्रात असलेले अधिकारी पेचात पडले. अधिकाऱ्यांनी या तिघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तिघांनाही फैलावर घेत फटकारले. त्यानंतर सत्य उघड झालं. ही महिला आधीच विवाहित होती. पण तिने नवऱ्याला अंधारात ठेवून प्रियकरासोबत गुपचूप विवाह केला. तिने आधीच नवरा असताना बेकायदा लग्न केल्याने मोठा पेचप्रसंग उद्भवला.
पूर्णिया येथील सरसी पोलिस ठाण्यात चंपावती गावातील एका व्यक्तीने आपल्या मुलीला पळवून नेल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी आरोपी युवकाला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्यावेळी त्याने तक्रारीत नमूद केलेली मुलगी त्याची पत्नी असल्याचं सांगितलं. त्याने लग्नाची कागदपत्रेही दाखवले. त्याचवेळी तक्रारीत आणखी एका व्यक्तीचं नाव होतं. तोही पोलिस ठाण्यात आला आणि त्यानेही ही मुलगी त्याची पत्नी असल्याचा दावा केला. त्याने कागदपत्रे दाखवून या महिलेसोबत उभा असलेला मुलगा आपलाच असल्याचं सांगितलं. दोन्ही पुरुषांनी एका स्त्रीवर पत्नी असल्याचा दावा केल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तिढा सोडवण्यासाठी हे प्रकरण कौटुंबिक सल्ला केंद्रात पाठवलं.
प्रकरण अधिकच किचकट
केंद्रात दोन्ही युवकांनी दिलेले कागदपत्रे तपासण्यात आले. यावेळी एक लग्न तीन महिन्यापूर्वी झालेलं दिसून आलं तर दुसरं लग्न अडीच वर्षापूर्वी झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे कौटुंबिक सल्ला केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्यांना फटकारलं. त्यामुळे या महिलेने आपण पहिल्या नवऱ्याला फसवून दुसरं लग्न केल्याची कबुली दिली. लग्नानंतर धर्मांतर केल्याचंही तिने मान्य केलं. त्यामुळे हे प्रकरण अधिकच किचकट झालंय.
पोक्सो अंतर्गत कारवाई
यावर कौटुंबिक सल्ला केंद्राने स्पष्टपणे सांगितले की, हिंदू विवाह अधिनियम आणि मुस्लिम विवाह अधिनियमानुसार, तलाक न घेतल्यास दुसरं लग्न वैध मानलं जात नाही. मुस्लिम युवकाने दिलेल्या शपथपत्रात सांगितले की, त्याने 6 वर्षांपूर्वी धाडक्याने विवाह केला आहे, परंतु त्यावेळी म्हणजे 6 वर्षांपूर्वी ही तरुणी अल्पवयीन होती. त्यामुळे त्या मुलीला पळवून नेल्यामुळे पोक्सो कायद्यांतर्गत कार्यवाही होऊ शकते. या सगळ्या प्रकरणामुळे कौटुंबिक सल्ला केंद्राने त्या मुलीच्या दुसऱ्या विवाहाला पूर्णपणे अवैध ठरवले.
असा झाला निर्णय
इतकं सर्व होऊनही ही मुलगी मुस्लिम तरूणासोबतच संसार थाटण्यावर ठाम होती. तर दुसरीकडे तिचा असली नवरा तिच्या चुकीला माफी देण्यास तयार होता. ती ऐकत नसल्याने आधीच्या नवऱ्याने मुलाच्या जन्मासी संबंधित रुग्णालयातील पुरावे दाखवले. तसेच मुलावर दावा केला. त्यानंतर केंद्राने या मुलाला आधीच्या नवऱ्याकडे सोपवण्याचे आदेश दिले. केंद्राचा हा आदेश ऐकल्यावर या महिलेच्या पायाखालची वाळू सरकली. तिने माफी मागत आधीच्या नवऱ्यासोबत राहण्याची परवानगी मागितली. आता या महिलेचं शुद्धीकरण करून तिला घरी आणण्याची तयारी सुरू झाली आहे.